

खडकी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संजय गांधी भाजी मंडईत रविवारी (दि. 4) रात्री लागलेल्या आगीत 11 हातगाड्या जळून खाक झाल्या. यात सुमारे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या भाजी मंडईत रात्रीच्या वेळी विक्रेते उरलेला माल बांधून हातगाड्या उभ्या करतात. यातील एका हातगाडीला पहाटे सुमारे तीनच्या सुमारास अचानक आग लागली.
इतर हातगाड्यांवर बांधण्यात आलेल्या प्लास्टिकमुळे ही आग झपाट्याने पसरली. याबाबत नागरिकांनी बोर्डाच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर सव्वातीनच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दीड तास अथक परिश्रम करून या आगीवर नियंत्रण मिळविले.
या आगीत 11 हातगाड्या जळून खाक झाल्या असून, मसाले, कटलरी साहित्य, सौंदर्यप्रसाधने व पूजेच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. या आगीत सुमारे 9 लाख रुपये नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे बोर्डाचे आरोग्य अधीक्षक शिरीष पत्की यांनी सांगितले. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबिन बलेचा यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
भाजी मंडईमध्ये लागलेल्या आगीची माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी पोहचलो. मात्र, अरुंद रस्ता असल्याने आत अग्निशमन बंब नेता आला नाही. त्यानंतर रस्त्यावर अग्निशमन बंब थांबवून पाइपद्वारे पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली.
– सतीश कांबळे, कर्मचारी, अग्निशमन दल
हेही वाचा