

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ-2023) मध्ये येथील शिवाजी विद्यापीठाने देशातील आघाडीच्या 200 शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान कायम राखले आहे. अशी माहिती विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक तथा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी दिली.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सोमवारी 2023 ची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कची क्रमवारी जाहीर केली. पहिल्या वर्षी 2016 मध्ये क्रमवारीत देशातील 3 हजार 565 तर गतवर्षी 5 हजार 543 शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी शिवाजी विद्यापीठ 101-150 या बँडमध्ये होते. यवर्षी 2023 मध्ये देशभरातील 8 हजार 686 शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या. यात शिवाजी विद्यापीठाने 151-200 बँडमध्ये देशातील आघाडीच्या 200 शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळविले आहे.
राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कची क्रमवारी अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, संशोधनपर व व्यावसायिक कृतिशीलता, विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण, महिलांसह विविध वंचित समाजघटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांशी संवाद व समन्वय या निकषांवर क्रमवारी आधारित आहे. विद्यापीठे व महाविद्यालये यांच्याबरोबरच संशोधन संस्था, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चर व नियोजन, वैद्यकीय, दंतवैद्यकीय, कायदा, कृषी व कृषिपूरक क्षेत्रे आणि नावीन्यता या क्षेत्रांतील शैक्षणिक संस्थांचा क्रमवारीत समावेश आहे.