नाशिक : द्राक्षपंढरीत थंडीची चाहुल | पुढारी

नाशिक : द्राक्षपंढरीत थंडीची चाहुल

उगांव ; पुढारी वृत्तसेवा :

निफाड तालुक्यातील द्राक्षपंढरी असलेल्या उगांव शिवडी परिसरासह तालुक्यात गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे. शनिवार दि २३ ऑक्‍टोबर रोजी पारा १३.५ अंशावर घसरला होता. चालु हंगामातील थंडीची ही चाहुल आहे.

गेल्या महिनाभरापासुन निफाड तालुक्यात परतीच्या पावसासह अवकाळी पाऊसाने शेतकरी वर्गाला हैराण करुन सोडले होते. त्यामुळे द्राक्ष बागायतदारासंह खरिप हंगामावर अवलंबुन असणारे शेतकरी बेहाल झाले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासुन आकाश स्वच्छ दिसु लागले आहे. तसेच सायंकाळी व सकाळी थंडीची जाणीव होऊ लागली आहे.

शनिवारी द्राक्ष बागायतदारांनी उगांव भागात हवामान अंदाजासाठी शेतात लावलेल्या तपमापकावर पारा १३.५ अंशापर्यंत घसरला होता. थंडीची चाहुल लागल्याने द्राक्षबागांच्या गोड्याबार छाटण्या आटोपत्या घेण्यासाठी द्राक्ष बागायतदारांची लगबग सुरु आहे. त्याचबरोबर थंडीमुळे पहाटे व्यायामाला नागरिकांची गर्दी वाढु लागली आहे. निफाड तालुक्यातील प्रमुख पर्यटन क्षेत्र असलेल्या नांदुरमधमेश्वर अभयारण्यात पहाटेच्या वेळी देशी विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट अन आल्हाददायक वातावरणात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचा राबता वाढू लागला आहे.

@ सद्याचे हवामान हे स्वच्छ व आल्हाददायक आहे. थंडीमुळे व्यायामासह दररोज निर्धारित आहार व सुकामेव्याचा नाष्टा आरोग्यास पोषक आहे. त्याचबरोबर जेष्ठ नागरिकांनी अशा आल्हाददायक वातावरणात सकाळच्या सुर्यकिरणांत चालणे आरोग्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे.

Back to top button