कोल्हापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीलाच हवी : आ. हसन मुश्रीफ | पुढारी

कोल्हापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीलाच हवी : आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. आतापर्यंत केवळ दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. या जागेवर शिवसेनेनेही दावा केला आहे. त्यांचेही बरोबर आहे. कारण, गेल्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. परंतु, वस्तुस्थिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समजावून सांगू, असे आ. हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी सांगितले. लोकसभेसाठी आपण इच्छुक नसून, विधानसभेची आणखी एक निवडणूक लढविणार आहे.

लोकसभा निवडणुकीत गतवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक होते; तर शिवसेनेचे संजय मंडलिक होते. त्यावेळी शिवसेना व भाजपची युती होती. त्यावेळी भाजप-सेना युतीचे लोकसभा मतदारसंघात राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक व चंद्रदीप नरके हे चार आमदार होते. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा एकही आमदार नाही. सध्या आपल्यासह काँग्रेसचे पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव व राष्ट्रवादीचे राजेश पाटील आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हवा. लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेकांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये आपण सुचविलेले नाव सर्वांनाच माहीत आहे. लोकसभेसाठी व्ही. बी. पाटील, चेतन नरके, के. पी. पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

के.पीं.चे नाव मेव्हण्याने सुचविले

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी माजी आमदार के. पी. पाटील यांचे नाव आपण सुचविलेले नाही. त्यांच्या मेव्हण्याने के. पी. यांचे नाव सुचविल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

Back to top button