नाशिक : मटाणेतील भंगार गोदाम आगीत भस्मसात; लाखोंची हानी | पुढारी

नाशिक : मटाणेतील भंगार गोदाम आगीत भस्मसात; लाखोंची हानी

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
मटाणे येथील भंगार गोदामाला बुधवारी (दि.31) दुपारी साडेअकरा वाजता आग लागली. यात संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडून, लाखोंचे नुकसान झाले आहे.

मटाणे येथे भिका पवार यांचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे देवळा येथे दुकान असून, जमा भंगार मटाणेतील मोठ्या गोदामात ठेवतात. या गोदामाला बुधवारी अचानक आग लागली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. आगीवर नियंत्रणाचे स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, कडक उन्हामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. सटाणा, मालेगाव व मनमाड येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. स्थानिक पाण्याचे टँकरही मागविले गेले. जवळपास चार बंबांद्वारे उशिराने आग आटोक्यात आली. उशिराने अग्निशमन यंत्रणा पोहोचल्याबद्दल नाराजी व्यक्त होते आहे. घटनेत जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण गोदाम जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात पेपर रद्दीसह प्लास्टिक मटेरिअल होते. घटनास्थळी तहसीलदार विजय सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक समीर बारवकर, गटविकास अधिकारी राजेश देशमुख आदींसह तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. तब्बल सहा ते सात आग धगधगत होती. आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी गोदामनजीक असलेल्या बांधावरील गवत पेटविण्यात आल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून, तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी मालक पवार यांनी केली. दरम्यान, देवळा नगरपंचायतीकडे अग्निशमन दल नसल्याचा मुद्दा या घटनेमुळे ऐरणीवर आला. शहराची वाढती लोकसंख्या व उपनगरे लक्षात घेता अग्निशमन बंब आवश्यक असल्याची बाब या घटनेमुळे अधोरेखित झाली. शहरातच अग्निशमन बंब असता तर वेळीच आग शमविता आली असती आणि संभाव्य नुकसान टळले असते, अशी खंत यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. प्रशासनाने त्वरित याबाबत निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा:

Back to top button