मुंबई : मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारा गजाआड | पुढारी

मुंबई : मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारा गजाआड

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मंत्रालयात कंत्राटी पद्धतीवर लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई अशा पदांवर नोकरी देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांकडून पैसे घेऊन बनावट नियुक्ती पत्र देत त्यांची फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिपेश भोईर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. दिपेश भोईर हा पालघर जिल्हा परिषदमध्ये नोकरीला होता. अपहाराच्या आरोपावरुन गुन्हा दाखल झाल्याने त्याला निलंबित करण्यात आले असून तेव्हापासून तो बेरोजगारांची फसवणूक करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या भोईरने एका मुख्याध्यापकाच्या मुलाला मंत्रालयात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून साडेतीन हजार रुपये घेतले होते. भोईरने मुलाला मंत्रालयात कंत्राटी पद्धतीवर डेटा एन्ट्री ऑपरेटर पदी नियुक्ती मिळाल्याचे पत्र आणि ओळखपत्र दिले. मात्र, नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आले. यानंतर फसवणूक झालेल्या तरुणाच्या तक्रारीवरुन मरिन ड्राईव्ह पोलिसांनी भोईर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच भोईर घरातून पसार झाला. तो वारंवार वास्तव्याची जागा बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.

पोलिसांनी गुप्त आणि तांत्रिक माहितीच्या आधारे भोईर हा डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजमध्ये असल्याची माहिती मिळवली. पोलिसांनी या लॉजवर छापेमारी करत भोईर याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथील डॉ. दिपेश मंगल भोईर या नावाचे सहायक प्रशासन अधिकारी (अति.) या पदनामाचे ओळखपत्र आणि मंत्रालयातील कंत्राटी लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि शिपाई अशा पदांची एकूण १५ जणांची नियुक्ती पत्र पोलिसांना सापडली. पोलिसांनी हा दस्तऐवज जप्त करुन भोईरला अटक केली. न्यायालयाने त्याला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

भोईर हा जिल्हा परीषद पालघर येथे अनुकंपावर नोकरीला लागला होता. २०१८ मध्ये त्याच्यावर अपहार केल्याचा आरोप झाला. तारापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर भोईरला निलंबित करण्यात आले. नोकरी गेल्यानंतर पुढे कोरोना काळात त्याला आर्थिक अडचण भासू लागल्याने त्याने लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. फसवणूक झालेले त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार करुन नये म्हणून अवघ्या पाचशे रुपयांपासून १५ हजार रुपयांपर्यंत रक्कम घेऊन तो लोकांची फसवणूक करत होता. जानेवारी २०२१ पासून त्याने अनेक बेरोजगारांकडून नोकऱ्यांसाठी ऑनलाईन रकमा घेऊन बनावट नियुक्ती पत्र दिल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

हेही वाचा : 

Back to top button