नाशिक : अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा “चंडिका’अवतार, चंडिकापूर येथे बाटली केली आडवी | पुढारी

नाशिक : अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा "चंडिका'अवतार, चंडिकापूर येथे बाटली केली आडवी

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

दिडोंरी तालुक्यातील चंडिकापूर येथे होणाऱ्या अवैध दारूविक्रीविरोधात आक्रमक होत परिसरातील महिलांनी थेट टपरीवर धाव घेत दारूविक्री बंद पाडली.

चंडिकापूर फाट्यावर रस्त्याला लागून पत्र्यांची टपरी आहे. ही टपरी गावात जाणाऱ्या रस्त्यावर आहे. या ठिकाणी पाववडा, नाश्ता यांची विक्री हाेते. या वस्तूंआड टपरीतून अवैध दारूची विक्री होत असल्याची चर्चा होती. हे समजल्यानंतर बुधवारी दि. ३१ मे रोजी सरपंच मंदाबाई कुवर, उपसरपंच बाळू जोपळे व काही ग्रामस्थांसह महिलांनी या ठिकाणी जमा होऊन अवैध विक्री बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. या कारणावरून टपरीचालक व गावकरी यांच्यात बराच वेळ बाचाबाची झाली. येथे होत असलेल्या अवैध देशी दारूविक्री विरोधात वणी पोलिस ठाण्यात अर्ज देण्यात आला आहे. या अनुषंगाने वणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण उदे व पोलिस हवालदार चव्हाण या ठिकाणी आले. त्यांनी या टपरीची झाडाझडती घेतली. तसेच येथे दारूविक्री करायची नाही याबाबत समज दिली. लोकांची दारू विक्रीबाबत तक्रार आल्यास कारवाई करण्याची ताकीदही दिली.

दारू व्यवसामुळे चंडिकापूर येथील दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाला होता. तेव्हापासून बचत गटाच्या महिला सरपंच, ग्रामस्थ महिलांनी अवैध दारू विक्रीविरोधात कंबर कसली आहे. अनेक दिवसांपासून या टपरीमध्ये दारूविक्री होत असल्याच्या ग्रामस्थांची तक्रारी आहेत. यावेळी ग्रामस्थ दत्तू वड, संजय कुवर, पुष्पा गांगोडे, सिंधूबाई गायकवाड, मंगळाबाई कुवर, सरला बागूल, विठाबाई कुवर, संगीता कुवर, फुलका मोंढे व ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button