जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भोजन पुरवठादाराचे बिल मंजूर झाल्यानंतर त्यापोटी खुशाली म्हणून तडजोडअंती 20 हजारांची लाच स्वीकारणार्या यावल आदिवासी प्रकल्पातील लेखापालास जळगाव एसबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.26) दुपारी चारच्या सुमारास आदिवासी प्रकल्प कार्यालयातच करण्यात आली. रवींद्र बी.जोशी असे लाचखोर लेखापालाचे नाव आहे.
आदिवासी वस्तीगृहात तक्रारदाराची पत्नी चालवत असलेल्या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून 2021-22 वर्षात भोजन पुरवठा करण्यात आला होता. त्यापोटी 73 लाखांचे बिल मंजूर होवून मिळाले होते. मात्र काम करून देण्याच्या मोबदल्यात मंजूर बिलाच्या अर्धा टक्के अर्थात 36 हजार 500 रुपयांची लाच मागण्यात आली व त्यात 20 हजारात तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपीने आदिवासी कार्यालयातच लाच स्वीकारताच त्यास एसीबीकडे अटक केली. नाशिक एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वात जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.