डॉ. प्रीती जोशी
पुढारी ऑनलाईन: १९ व्या शतकाच्या सुरुवातीला कृष्णधवल चलतचित्रांपासून सुरु झालेला दूरचित्रवाणी तंत्रज्ञानाचा आजच्या 'रील्स'पर्यंतचा प्रवास हा माध्यम क्षेत्राची आजवरील झेप अधोरेखित करणारा आहेच, शिवाय करियरच्या अनेक वाटा दाखविणारा असाही आहे.
नजीकच्या भविष्यात सामाजिक माध्यमांचा जनसामान्यांच्या आयुष्यावरील वाढता प्रभाव लक्षात घेत आज मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांपर्यंत 'कॉन्टेंट' पोहचत असला तरीही तो पोहोचताना माध्यमांसोबतच विषय हे देखील महत्त्वाचे ठरत आहेत. या माध्यमांमध्ये बातमीपत्रे, रेडीओवरील कार्यक्रम, चर्चात्मक कार्यक्रम, सांगीतिक कार्यक्रम, जाहिराती आणि चित्रपट यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यासोबतच संशोधन, बातमीदारी, कॉन्टेंट रायटिंग, बातमी व व्हिडिओ संपादन, छायाचित्रे हे देखील यातील काही महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे बातमीदारांसोबतच, कॅमेरामन, तंत्रज्ञ आणि प्रोडक्शन टीम सोबतच मार्केटिंग, सेल्स, प्रमोशन आणि जाहिरात यांसाठी देखील कौशल्याधारित व्यक्तींची गरज आज निकडीची झाली आहे आणि म्हणूनच मास कम्युनिकेशन क्षेत्र हे महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून समोर येत आहे.
तरुण पिढीसाठी, ब्रॉडकास्ट इंडस्ट्री हे एक अत्यंत फायद्याचे करिअर ठरत आहे. कारण ते विविध कौशल्यांच्या आधारावर उभे राहिले असले तरी याच ठिकाणी अनेक संधी आपल्याला उपलब्ध होत असलेल्या पहायला मिळत आहेत.
टीव्ही, न्यूज चॅनल्स, सोशल मीडिया एजन्सी, डिजिटल मार्केटिंग कंपन्या, मीडिया हाऊसेस आणि कॉर्पोरेट सेक्टरद्वारे मोठ्या संख्येने आज पत्रकारांची नियुक्ती होत आहे. आता पत्रकारितेचे क्षेत्र हे अनेक क्षेत्रांशी संलग्न असल्याने पत्रकार हे राजकारण, व्यवसाय, क्रीडा, मनोरंजन, सेलिब्रिटी, चालू घडामोडी, हवामान आणि जीवनशैली या विषयांशी संबंधित क्षेत्रात काम करत आहेत.
आजच्या काळातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पत्रकारिता ही केवळ घडणाऱ्या घटनांवर अवलंबून राहिलेली नसून उपलब्ध माहितीसोबतच संशोधन, विश्लेषण आणि शोधपत्रकारिता यामध्ये देखील विस्तारत आहे.
कोविडनंतरच्या काळात पर्यावरण अहवाल, ऊर्जा, हवामान बदल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, इंडस्ट्री ४.०, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि हेल्थकेअर यासारख्या क्षेत्रांचे ज्ञान आणि समज असलेल्या तरुण- नवोदित पत्रकारांसाठी देखील जास्तीच्या आणि उत्कृष्ट अशा संधी आज उपलब्ध झाल्या आहेत, हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे.
१. विचार करून महाविद्यालयाची निवड –
ब्रॉडकास्ट जर्नलिझम पदवीसाठी महाविद्यालयाच्या निवडीचा विचार करणे ही तुमच्या व्यावसायिक कारकीर्दीसाठी केलेली गुंतवणूक आहे हे लक्षात घ्या. महाविद्यालय निवडताना अभ्यासक्रम, प्रात्यक्षिक, प्राध्यापक सदस्यांची उत्कृष्टता, शिकविण्याची पद्धती, पायाभूत सुविधा, इंटर्नशिप आणि जॉब प्लेसमेंट, उद्योग संस्थांशी असलेले टाय-अप, माजी विद्यार्थी कोण आहेत, त्याची माहिती आणि अर्थात शुल्क यांचा जरूर विचार व्हायला हवा.
२. पत्रकारितेच्या संधी उपलब्ध असलेली शहरे –
मुंबई, पुणे, बंगळुरु, हैदराबाद, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि चंदीगड ही यांपैकी काही महत्त्वाची शहरे आहेत जी त्यांच्या उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी ओळखली जातात. ही शहरे शैक्षणिक संस्था आणि नोकरी यांची देशातील प्रमुख केंद्रेही आहेत. वर उल्लेख केलेल्या ठिकाणी महत्त्वाकांक्षी माध्यम व्यावसायिकांसाठी भरपूर संधी आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमचे करिअर सुरू करायचे असेल तर योग्य शहरे निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
३. पत्रकारिता क्षेत्रातील यशस्विता –
प्रतिष्ठित संस्थांमध्ये इंटर्न म्हणून काम करणे किंवा कमी कालावधीसाठी पूर्णवेळ नोकरी सुरू केल्याने या क्षेत्रात तुम्हाला बरेच 'एक्सपोजर' मिळू शकते. काहीजण हे थेट संपादक म्हणून आपली बहुतांश कारकीर्द काम करतात आणि पुढे हळूहळू माध्यम व्यवस्थापक किंवा संपादकीय विभागातील 'डिसीजन मेकर्स' म्हणून पदोन्नती घेतात तर अनेक जण संपूर्ण कारकिर्दीत पत्रकार म्हणून काम करण्याचा निर्णयही घेतात.
४. पत्रकारितेतील वेतन –
पत्रकारितेतील वेतनश्रेणी तुम्ही शैक्षणिक पात्रता, व्यवहारचातुर्य, व्यावहारिकता, फिल्डवर काम केल्याचा अनुभव, तुमची कौशल्ये, तुमचे व्यक्तीमत्त्व, तुमच्या ओळखी यांसारख्या विविध घटकांवर अवलंबून असतो. भारतातील माध्यम क्षेत्र हे सातत्याने विकसित होणारे आणि अनेक संधींची उपलब्धता असणारे क्षेत्र आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत दरवर्षी अनेक ब्रॉडकास्ट कंपन्या स्थापन केल्या जात आहेत. ज्या त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी सक्षम पत्रकारांची वाढती मागणी निर्माण करतात. प्रस्थापित कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना नवीन सेटअपच्या विरूद्ध तुलनेने चांगले पॅकेज देतात. तुमच्या करिअरच्या सुरुवातीला तुम्ही किती पैसे कमावत आहात याकडे लक्ष न देणे ही तुमच्यासाठी एक 'टीप' आहे. तुमची प्रतिभा, अनुभव आणि ज्ञान तुम्हाला या क्षेत्रात पुढील काळात उच्च स्थानावर घेऊन जाण्यास नक्कीच मदत करेल हे कायम लक्षात ठेवा.
५. नेटवर्किंग आणि नातेसंबंधांची उभारणी –
नवीन नातेसंबंध निर्माण करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले समवयस्क, सहकारी, मार्गदर्शक आणि प्राध्यापकांसोबत हे नाते संबंध कायम राखणे आज आवश्यक आहे. माध्यम उद्योग हा एकमेकांशी असेलेल्या संबंधांवर कार्यरत आहे. बहुतेक नेटवर्किंग हे प्रयत्नशील राहून केले जाऊ शकते हे कायम लक्षात ठेवा.
(लेखिका एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या (कोथरुड) स्कूल ऑफ लिबरल आर्टसच्या प्रमुख आहेत.)