पिंपरी: आकुर्डीत दुचाकी चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई, सम-विषम पार्किंग असूनही वाहने दुतर्फा उभी

पिंपरी: आकुर्डीत दुचाकी चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई, सम-विषम पार्किंग असूनही वाहने दुतर्फा उभी
Published on
Updated on

आकुर्डी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: आकुर्डीतील धर्मराज चौक ते गुरुद्वारा चौकात वाहतूक पोलिसांकडून गुरुवार (दि. 25) धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये 49 दुचाकी चालकांवर कारवाई करत दंड आकारण्यात आला. फक्त कारवाई करून उपयोग नाही, तर वाहनचालकांना वाहतूक नियमांबद्दल शिस्त लावणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

आकुर्डी परिसरात सम- विषम अशी पार्किंगची सोय असूनही, अनेक बेशिस्त वाहनचालक रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी बिनदिक्क्त उभ्या करतात. काही वाहनचालक पदपथावर गाड्या उभ्या करतात. त्यामुळे नागरिकांना पदपथांवरून चालणे कठीण होते.

आकुर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने येथे पाकिंगची समस्या निर्माण होत आहे. त्यातच बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूककोंडीदेखील पहावयास मिळते. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू केल्यामुळे दुचाकीचालकांना थोडीफार का होईना शिस्त लागू शकेल.

पदपथावरून चालणेही अवघड

आकुर्डीतील धर्मराज चौक ते गुरुद्वारा चौक तसेच रावेतकडे जाणारा रस्ता हा वर्दळीचा आहे. महाविद्यालयीन मुला-मुलींची या ठिकाणी गर्दी असते. त्यांची वाहने रस्त्यावरच उभी केलेली दिसून येते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा या मार्गावर वाहतूककोंडी होते.

महापालिकेने अनेक ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावले आहेत. तरीदेखील काही वाहनचालक बेशिस्तपणे आपली वाहने या ठिकाणी उभी करतात. वाहतूक पोलिसांकडून या रस्त्यावर सध्या कारवाई सुरू आहे. सम-विषम पार्किंगचे नियोजन असूनसुद्धा दुतर्फा पार्किंग केले जात असल्याने वाहतूककोंडीची समस्या नेहमीचीच झाली आहे. येथे ठोस उपाययोजना करावयास हवी, असा सूर आता नागरिकांमधून उमटत आहे.

सततच्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

परिसरात महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, रेल्वे स्टेशन, बसस्थानक तसेच खाऊ गल्ली असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच विद्यार्थी, नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगसंबंधी फलक लावण्यात आले आहेत. वाहतूक सुरळीत व्हावी, वाहनधारकांना शिस्त लागावी, हा त्यामागील हेतू आहे. परंतु, परिसरातील दुचाकीचालक बेशिस्तपणे वाहने रस्त्याचाकडेला उभी करीत असून, येथे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे.

नागरिकांनी आपली वाहने पार्किंग करताना कोणालाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने लावायला हवी. मात्र, बर्‍याच जणांकडून याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे सार्वजनिक रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.
– स्थानिक नागरिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news