नाशिकमध्ये पाचशेच्या 2800 दशलक्ष नोटांची होणार छपाई | पुढारी

नाशिकमध्ये पाचशेच्या 2800 दशलक्ष नोटांची होणार छपाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

दोन हजारची नोट चलनातून बंद होणार असल्याने भविष्यात ५०  रुपयांच्या नोटांची मागणी वाढणार आहे. एकंदरीतच परिस्थिती पाहता नाशिकच्या नोट प्रेसमधील १,५०० कामगारांना पुढील चार महिने २४ तास कामकाज करावे लागणार आहे.

२०१८-१९ मध्येच २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे आता पाचशेच्या नोटांची अधिक गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या नोट प्रेसमध्ये पाचशेच्या जवळपास २ हजार ८०० दशलक्ष नोटांची छपाई करण्यात येणार आहे. दरम्यान, अर्थ मंत्रालयाने नाशिक करन्सी नोट प्रेसला ५०० रुपयांच्या नोटांची छपाई करण्याचे उद्दिष्ट दिले होते. एप्रिलपासून आतापर्यंत ३० कोटी नोटांची छपाईही झाली. आता दोन हजाराची एक नोट बदलून देण्यासाठी पाचशे रुपयांच्या ४ नोटा लागणार असल्याने ५०० च्या नोटांची मागणी वाढणार आहे.

नाशिकच्या नोट प्रेसने नोटबंदी काळात महत्त्वाची भूमिका बजावत जवळपास दोन वर्षे दिवस-रात्र मेहनत घेतली होती. त्यावेळी दोनशे आणि पाचशेच्या अंदाजे दहा हजार मिलियन नोटांची छपाई केली.

७,५०० दशलक्ष नोटांची गरज

सध्या दोन हजारांच्या अंदाजे १ हजार ८३३ दशलक्ष नोटा बाजारात आहेत आणि हे बघता पाचशेच्या जवळपास ७,५०० दशलक्ष नोटांची भविष्यात गरज भासणार आहे. म्हैसूर, सालभोनी, देवास आणि नाशिकमध्ये या नोटा तयार केल्या जाणार असून, येत्या चार महिन्यांत २ हजार ८०० दशलक्ष नोटांची छपाई एकट्या नाशिक नोट प्रेसमध्ये होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button