नाशिक : लाचखोर खरेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला | पुढारी

नाशिक : लाचखोर खरेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तक्रारदाराकडून ३० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या जिल्हा उपनिबंधक संशयित सतीश भाऊराव खरे (रा. कॉलेजरोड) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. खरे हे मध्यवर्ती कारागृहात आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालावर आलेल्या आक्षेपाच्या तक्रारीवर निकाल बाजूने लावण्याच्या मोबदल्यात खरे यांना तक्रारदाराकडून १५ मे रोजी राहत्या घरात लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्यांना न्यायालयाने २० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यादरम्यान, खरेंकडे ५४ तोळे वजनाचे साेन्याचे दागिने, रोकड, आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आले. शनिवारी (दि.२०) न्यायालयाने खरेंना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. जामिनासाठी खरे यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला. त्यावर सोमवारी (दि.२२) सुनावणी झाली. यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खरे यांचा अर्ज नामंजूर करण्यासाठी बाजू मांडली. त्यानुसार विशेष न्यायालयाने खरे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

घरझडतीत रोकड व सोन्याचे दागिने आढळले

लाचेची रक्कम मोठी असून, घरझडतीत मोठ्या प्रमाणात रोकड व सोन्याचे दागिने आढळले आहेत. त्याचप्रमाणे खरेविरोधात तक्रारीही आल्या असून, त्यांची चौकशी करणे बाकी आहे. भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड असून त्यांना जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद ॲड. राजेंद्र बघडाणे यांनी न्यायालयात केला. दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश आर. आर. राठी यांनी खरे यांचा जामीन अर्ज फेटाळला.

हेही वाचा :

Back to top button