अहमदनगर : आजपासून बदला 2000 च्या नोटा ! जिल्हा बँकेतही सुविधा | पुढारी

अहमदनगर : आजपासून बदला 2000 च्या नोटा ! जिल्हा बँकेतही सुविधा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : देशात दोन हजार रुपये किमतीच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंतच चलनात राहणार आहेत. त्यामुळे मंगळवार (दि.23)पासून आपल्याकडे असलेल्या दोन हजार रुपये किमतीच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांची बँकांकडे धावपळ सुरू होणार आहे. जिल्हा बँकेनेही रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एकावेळी जास्तीत जास्त 20 हजार रुपयांच्याच म्हणजे दोन हजार रुपये किमतीच्या दहा नोटा बदलून देण्याचे धोरण घेतले आहे. त्यामुळे नोटा बदलताना अनेकांची दमछाक होणार आहे.

गेल्या सात वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली होती. त्या वेळी पाचशे आणि एक हजार रुपये किमतीच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्या वेळीही नोटा बदलून घेताना नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी पुन्हा दोन हजारांच्या नोटबंदीचे धोरण घेण्यात आले आहे.

30 सप्टेंबर 2023 पर्यंतच दोन हजारांची नोट चलनात असणार आहे. त्यानंतर ती नोट बाद होणार असल्याने आपल्या नोटा बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या पुन्हा राष्ट्रीयीकृत तसेच जिल्हा बँकेच्या शाखांसमोर रांगा लागल्याचे पाहायला मिळणार आहे. आज मंगळवारपासून नोटा बदलून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा बँक आणि राष्ट्रीयीकृत बँका हा पर्याय असणार आहे.

सोनेखरेदी वाढली!

नोटाबंदीबाबतची घोषणा होताच, अनेकांनी आपल्याकडील दोन हजारांच्या नोटा वापरात आणण्यासाठी सोनेखरेदी हा पर्याय निवडला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून सराफ दुकानेही ग्राहकांनी फुललेली दिसत आहे. ही गर्दी आणखी वाढताना दिसेल, असाही अंदाज आहे.

जिल्हा बँकेत फॉर्म भरणे बंधनकारक

जिल्हा बँकेच्या शाखेत नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहकांना एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहेत. त्यात ग्राहकाचे नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅन नंबर आणि नोटांचा नंबरही बंधनकारक असणार आहे. त्यानंतरच नोटा बदलून देण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

पतसंस्था नोटा स्वीकारू शकत नाही?

आरबीआयच्या नियमानुसार दोन हजारांच्या नोटा पतसंस्थांनी स्वीकारू नये, असे सुचविल्याचे सांगितले जाते. मात्र, यावर मार्ग निघावा यासाठी पतसंस्था चळवळीकडून केंद्रस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे यातून काय मार्ग निघतो, याकडे लक्ष असणार आहे.

जिल्हा बँकेचे 11 कोटी बदलून मिळेनात!

जिल्हा बँकेकडे सध्या दोन हजारांची 10 कोटींच्या आसपास रक्कम आहे. सात वर्षांपूर्वीच्या नोटाबंदीवेळी जिल्हा बँकेने पाचशे आणि एक हजाराच्या तब्बल 11 कोटींच्या नोटा बदलून दिल्या होत्या. मात्र त्यानंतर या नोटा बदलून देण्यासाठी अडचणी आल्या. आजही या प्रकरणाचा न्यायालयात खटला सुरू आहे. असे असताना आता जिल्हा बँकेने नोटा बदलून देताना सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा बँकेत पतसंस्थांची खाती आहेत; मात्र पतसंस्थांना जिल्हा बँक दोन हजारांच्या नोटा बदलून देत नाही. त्यामुळे पतसंस्था नोटा स्वीकारू शकत नाही. परिणामी, नागरिकांनी राष्ट्रीयीकृत बँकेतूनच नोटा बदलून घेणे योग्य ठरेल.

                                                  – शिवाजीराव कपाळे,
                                              अर्थतज्ज्ञ, सहकार चळवळ

जिल्हा बँकेच्या जिल्ह्यात 297 शाखा आहेत. या ठिकाणी रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ग्राहकांना 20 हजार रुपये किमतीच्या नोटा बदलून दिल्या जातील. खात्यावर भरणा करण्यासाठी रकमेचे बंधन नसले, तरी नियम व अटी लागू असतील.

                                                – रावसाहेब वर्पे;
                                    कार्यकारी संचालक, जिल्हा बँक

Back to top button