नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. राठी यांनी शुक्रवारी (दि. १२) जन्मठेप व २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. बाळू पंडित खेटरे (३५, रा. वासाळी गाव, ता. नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वासाळी गावात १२ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ८ ते ११ च्या सुमारास आरोपी खेटरे याने पत्नी वैशाली बाळू खेटरे (२७) हिला दोन दिवसांपूर्वी दुपारच्या वेळी कुठे गेली होतीस, असा जाब विचारत मारहाण केली. पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी वैशालीला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करीत चटकेही दिले होते. त्यानंतर गळा आवळून तिचा खून केला होता. या प्रकरणी सातपूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एच. के. नागरे यांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीविरोधात सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायधीश आर. आर. राठी यांच्यासमोर झाली. पंच, साक्षीदारांच्या साक्षीसह परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्या. राठी यांनी आरोपीला शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून योगेश कापसे, रेश्मा जाधव व राजेंद्र बघडाणे यांनी कामकाज पाहिले. तर पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक डी. एस. काकड, वाय. डी. परदेशी, हवालदार डी. बी. खैरनार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.
हेही वाचा :