चंद्रपूर : काँग्रेस नेते रावत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मूल येथे कडकडीत बंद | पुढारी

चंद्रपूर : काँग्रेस नेते रावत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मूल येथे कडकडीत बंद

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मूल येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गुरूवारी (दि.११) रात्री अज्ञातांनी केलेल्या हल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (१२ मे) चक्काजाम आंदोलन करून मूल शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. घटनेचे गांर्भीय लक्षात घेता पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

संतोष सिंग रावत यांच्यावर गुरुवारी रात्री मुल शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून निघत असताना चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात इसमाने बंदुकीतून गोळी झाडून जिव घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ती गोळी हाताला लागून गेल्याने रावत या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. घटनेनंतर रावत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. यानंतर मुल पोलिसांनी शहरात सर्वत्र नाकाबंदी करून आरोपीचा शोध घेणे सुरू केले. परंतु आरोपी पसार झाले.

या घटनेचा राजकीय व सहकार क्षेत्रसह सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी मुल शहरात चक्काजाम आणि शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी 9 वाजता गांधी चौकात काँग्रेस, सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी चौकात टायर जाळून व चक्काजाम करून हल्ल्याचा निषेध केला. यावेळी व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. आंदोलनादरम्यान ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी, भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी 48 तासांच्या आत आरोपींना पकडून कठोर कारवाई करावी. या घटनेची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली. यावर लवकरात लवकर आरोपी जेरबंद होतील, असे अश्वासन पोलिस अधिक्षकांनी दिले.

हेही वाचा : 

Back to top button