पुणे महापालिकेच्या चार प्रकल्पांचे सोमवारी होणार उद्घाटन | पुढारी

पुणे महापालिकेच्या चार प्रकल्पांचे सोमवारी होणार उद्घाटन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे महापालिकेच्या चार प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन सोमवारी (दि. 15) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पामध्ये दोन ठिकाणी उड्डाणपुलांचे भूमिपूजन, तर एका पाणी योजनेचे लोकार्पण आणि एका पाणी योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील सूस-म्हाळुंगे या 200 कोटींच्या पाणी योजनेचे भूमिपूजन तसेच समान पाणी योजनेंतर्गत बालेवाडी-बाणेरसाठीच्या स्वतंत्र जलवाहिनी, पाण्याच्या टाक्यांचे तसेच पाणी वितरणव्यवस्थेच्या लोकापर्णाच्या कार्यक्रमाचा यात समावेश आहे.

तसेच, सनसिटी रस्ता ते कर्वेनगरला जोडणार्‍या उड्डाणपुलाचे भूमिपूजन आणि कोरेगाव पार्क येथील जुना पूल पाडून नव्याने बांधण्यात येणार्‍या उड्डाणपुलाचे भूमिपूजन, अशा या प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री येणार आहेत. हे सर्व कार्यक्रम बालेवाडी येथील हायस्ट्रीट मैदान येथे सायंकाळी 7 वाजता होणार आहेत.

Back to top button