नाशिक : गिरणा डॅम धरणावरील पुलावरून पायी जाण्यास मुभा द्यावी - ग्रामस्थांचे निवेदन | पुढारी

नाशिक : गिरणा डॅम धरणावरील पुलावरून पायी जाण्यास मुभा द्यावी - ग्रामस्थांचे निवेदन

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा

गिरणा डॅम धरण परिसरातील नागरिकांना मालेगाव तालुक्यात जाण्यासाठी गिरणा धरणावरील असलेल्या पूल खुला करुन मिळावा. यासाठी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर दादा पगार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आज मंगळवार (दि.9) नांदगावचे नायब तहसीलदार चेतन कोनकर यांना निवेदन दिले.

गेल्या वर्षभरापासून गिरणा धरणावरील पुलाचा वापर करण्यास गिरणा धरण प्रशासनाने मज्जाव केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या पुलावरून पायी जाण्यासाठी दोन्ही बाजूने बंद करण्यात आलेले दरवाजे हे खुले करून पुलाचा वापर करू देण्यास परवानगी मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहेे. गिरणा धरणाची निर्मिती होऊन ६० वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. इतक्या दीर्घ कालावधीत येणाऱ्या किंवा जाणाऱ्या रहिवासी नागरिकांचा कधीही त्रास झाला नाही. परंतु गेल्या एका वर्षभरापासून गिरणा डॅम पुलावरून नागरिकांना ये – जा करण्यास मनाई केल्याने स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वस्तीमध्ये अनेक कुटूंब मासेमारी करून इतरत्र मासे विक्री करून कुटुंबाचे पालन पोषण करत असतात. त्यांच्याकडे अन्य कोणताही पर्यायी व्यवसाय नसल्याकारणाने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे या नागरिकांना मालेगावी आवश्यक ती कामे करण्यासाठी येथील मार्गाचा उपयोग होतो. आजारी पेशंट, शालेय विद्यार्थी तसेच अन्य महत्वाचे कामे असल्यास पुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. परंतु गेल्या एक वर्षापासून पुलावरून स्थानिकांना ये-जा करण्यास मनाई केल्यामुळे येथील वस्तीवरील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी याकडे त्वरीत लक्ष घालून नागरिकांना येण्या जाण्यास परवानगी द्यावी, यासाठी नांदगावच्या तहसीलदाराना प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तसेच लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी निवेदन दिले. यावेळी सोनू दळवी, श्याम जावरे, नारायण सौदांणे, सागर सौंदाणे, अशोक जावरे, वाल्मिक जावरे, आप्पा ढोले, कल्पना सौंदाणे, मंगल पवार, नर्मदाबाई परदेशी, आशाबाई आहेर, मालताबाई जावरे, संगिताबाई जावरे आदी उपस्थित होते,

हेही वाचा:

Back to top button