Cheetah Dies : कुनो नॅशनल पार्कमध्ये तिस-या चित्त्याचा मृत्यू, नर चित्त्याच्या हल्ल्यात मादीने गमावला जीव | पुढारी

Cheetah Dies : कुनो नॅशनल पार्कमध्ये तिस-या चित्त्याचा मृत्यू, नर चित्त्याच्या हल्ल्यात मादीने गमावला जीव

पुढारी ऑनलाईन डेस्क : Cheetah Dies : कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्ताचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यातील हा तिस-या चित्त्याचा मृत्यू आहे. मुख्य वनसंरक्षक जे.एस.चौहान यांनी याला दुजोरा दिला आहे.

मुख्य वनसंरक्षक चौहान यांच्या माहितीनुसार, कुनो नॅशनल पार्कच्या मोठ्या परिसरात झालेल्या आपसी भांडणात तिसऱ्या दक्षा नावाच्या मादी चित्त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी (9 मे) सकाळी 10:45 मिनिटांनी दक्षा निरीक्षण पथकाला जखमी अवस्थेत आढळली. पशुवैद्यकांनी तिच्यावर उपचार केले. मात्र, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दक्षा चित्त्याचा मृत्यू झाला.’ (Cheetah Dies)

नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून कुनो नॅशनल पार्कमध्ये 20 चित्ते आणण्यात आले होते, त्यापैकी 17 आता शिल्लक आहेत. दोन चित्त्यांचा या आधीच मृत्यू झाला आहे. मार्च महिन्यातमध्ये साशा मादी चित्त्याचा मृत्यू मूत्रपिंडाच्या आजारामुळे झाला होता. एप्रिल महिन्यात उदय नावाचा नर चित्ता आजारी पडल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मरण पावला होता.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सांगितले की, पाच चित्ते – तीन मादी आणि दोन नर – जूनमध्ये मान्सून सुरू होण्यापूर्वी कुनो नॅशनल पार्क (KNP) येथे अनुकूलतेच्या शिबिरांमधून मुक्त केले जातील. (Cheetah Dies)

Back to top button