पुणे: देशी कट्ट्यासह जिवंत काडतूस हस्तगत, पौडमध्ये एक जण ताब्यात | पुढारी

पुणे: देशी कट्ट्यासह जिवंत काडतूस हस्तगत, पौडमध्ये एक जण ताब्यात

पौड (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पौड (ता. मुळशी) येथे एका जणाकडून १ बंदूक व जिवंत काडतूस पौड पोलिसांनी हस्तगत केले. याप्रकरणी मनोज उर्फ मॉन्टी देवराम भिलारे (वय ३१, रा. सुर्वेवाडी दारवली) याला अटक करण्यात आली आहे.

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस गुन्हे प्रतिबंधात्मक पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारमार्फत पौड ते कोळवण रस्त्यावरील पौड गावात लावण्या बिअर शॉपीसमोर रोडवर एक जण एक बंदूक घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांना घटनेची माहिती देऊन पोलिसांच्या एका पथकाने घटनास्थळी जाऊन वर्णन केलेल्या व्यक्तीचा शोध घेतला. तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच पोलिस पथकाने त्याला जागीच पकडले. पळून जाण्याचे कारण विचारले असता, त्याने उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली. शंका आल्याने त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे कमरेस ३५ हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तुल व १०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ३५ हजार १०० रुपयांचा माल मिळून आला.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांविरुध्द विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कामगिरी हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड, संदीप चव्हाण, नंदकुमार गडाळे, पोलिस नाईक संतोष दावलकर, सचिन सलगर, ईश्वर काळे, चंद्रकांत (आबा) सोनवणे, महेश पवार, गौतम लोकरे, सागर नामदास यांच्या पथकाने केली.

Back to top button