नाशिक : हौस म्हणून पिस्तूल बाळगणे रिक्षाचालकास भोवले | पुढारी

नाशिक : हौस म्हणून पिस्तूल बाळगणे रिक्षाचालकास भोवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गावठी कट्टा बाळगणाऱ्या रिक्षाचालकास दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. राजेंद्र पद्माकर विसपुते (३९, रा. नांदूरनाका) असे पकडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. आडगाव परिसरात रिक्षा चालविणाऱ्या राजेंद्रने हौस म्हणून गावठी कट्टा बाळगत इतरांना धाक दाखवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. राजेंद्र विरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरोडा व शस्त्रविरोधी पथकाचे अंमलदार महेश खांडबहाले यांना संशयिताबाबत माहिती मिळाली. त्यांनी सहायक निरीक्षक किरण रौंदळे यांना कळविल्यानंतर सापळा रचण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार अंमलदार विजयकुमार सूर्यवंशी, संदीप डावरे, विशाल जोशी, प्रवीण चव्हाण आणि मनीषा कांबळे यांच्या पथकाने नांदूर नाका परिसरात सापळा रचला. पथकाने राजेंद्र यास ताब्यात घेत त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह एक जिवंत काडतुस व एमएच १५ एफयू ६०९९ क्रमांकाची रिक्षा जप्त केली. त्यास आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याने पिस्तुलाची खरेदी कोठून आणि कशासाठी केली, याबाबत आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button