राज्यातील बसस्थानकांमध्ये ‘नाथजल’ची चढ्या भावात विक्री; प्रवाशांची होतेय लूट | पुढारी

राज्यातील बसस्थानकांमध्ये ‘नाथजल’ची चढ्या भावात विक्री; प्रवाशांची होतेय लूट

आळेफाटा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या ‘रेलनीर’ च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील बसस्थानके व आगारांमध्ये प्रवाशांकरिता ‘नाथजल’ या नावाने अधिकृतरीत्या बाटलीबंद पाणी विक्री सुरू केली आहे. या योजनेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना संबंधित स्टॉलधारकांकडून प्रवाशांची अडवणूक होत आहे.

‘नाथजल’च्या एक लिटरच्या बाटलीची किंमत 15 रुपये असताना प्रत्यक्षात मात्र 20 रुपये घेतले जातात. ‘कुलिंग चार्ज’च्या नावाखाली एसटी प्रवाशांच्या होणार्‍या या लुटीकडे प्रशासकीय पातळीवरून मात्र दुर्लक्ष केले जात आहे. एसटी बसस्थानकामध्ये या अगोदर लोकल ब्रँडचे बाटलीबंद पाणी अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये प्रवाशांना विकत घ्यावे लागायचे. या पाण्याची गुणवत्ता जेमतेम असल्यामुळे सहाजिकच प्रवाशांना आर्थिक भुर्दंड व आरोग्यविषयक समस्येचा सामना करावा लागायचा.

मात्र, 2020 मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब यांच्या संकल्पनेतून ‘नाथजल’ या नावाने एसटी ने स्वतःच पाणी विक्री करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राची संत परंपरा असलेल्या श्रेणीतील सर्वोच्च स्थानावरील संत एकनाथ महाराज यांच्या नावाने ही पाणी विक्री सुरू करण्यात आली. त्यासाठी पुण्यातील एका खासगी कंपनीला बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्याचा ठेका देण्यात आला. राज्यातील सर्व बसस्थानके व आगारांमध्ये टप्प्याटप्प्याने कंत्राटी पद्धतीने पाणी विक्रीचे स्टॉल सुरू करण्यात आले.

650 मिलिलिटर व 1 लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये नाथजल विक्रीसाठी उपलब्ध असून, यांचा दर अनुक्रमे 10 रुपये व 15 रुपये इतका आहे. प्रत्येक 650 मिलिलिटर बाटलीबंद पाण्यामागे 45 पैसे आणि एक लिटल बाटलीबंद पाण्यामागे एक रुपया एसटीला मिळतो. मात्र, राज्यभरात अपवाद वगळता कोणत्याही स्टॉलवर ’नाथजल’ वरील निर्धारित किमतीत विक्री केली जात नाही.

सर्वाधिक मागणी असलेल्या एक लिटरच्या पाण्याच्या बाटलीसाठी स्टॉलधारक 15 रुपयेऐवजी थेट 20 रुपये आकारणी करतात. याबाबत प्रवाशांनी विचारणा केल्यास कुलिंग चार्जचे कारण सांगितले जाते. याबाबत बसस्थानकात तक्रारी करूनदेखील एसटी प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने प्रवाशांकडून खंत व्यक्त केली जात आहे.

Back to top button