राज ठाकरे फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत? छगन भुजबळांचा सवाल

राज ठाकरे फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत? छगन भुजबळांचा सवाल

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज राज्यातील प्रत्येक घटकाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती केली, त्यांनी सर्वांना सोबत घेतले. त्यांच्यानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीचे फार मोठे काम केले. म्हणून शरद पवार म्हणाले की, या महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर हे महत्त्वाचे आहे. अगदी प्रबोधनकार ठाकरे यांनीदेखील बरचसे काम फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर केलं आहे. त्यामुळे त्यांचे नाव घेण्यात वावगे काय आहे. शरद पवार हे नेहमी शिवाजी महाराजांबद्दल बोलतात, मात्र राज ठाकरे हे फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

रत्नागिरी येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी खा. शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य केले. त्यानंतर आज नाशिकमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला. राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की, शरदचंद्र पवार यांच्यासोबत मी ९१ पासून आहे. पवार हे अनेक भाषणांत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात, तसेच त्यांच्या इतिहासाची उजळणीदेखील ते करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पवार यांची प्रकट मुलाखत घेतली, त्यावेळीदेखील शरद पवार यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले की, दिल्लीत आपले जे नेते काम करतात त्यांना दिल्लीत मराठा नेते असे म्हटले जाते. अगदी तो नेता कुठल्याही समाजाचा असला तरी, असे उत्तर पवार यांनी राज ठाकरे यांना दिल्याची आठवण त्यांनी राज ठाकरे यांना करून दिली.

प्रबोधनकार ठाकरे यांनीदेखील फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून मांडले. ही पुस्तके माझ्या संग्रही आहेत. राज ठाकरे यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेतले तर त्यात बिघडले कुठे, अशी टिप्पणीदेखील छगन भुजबळ यांनी यावेळी केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news