फक्त आंघोळीसाठी दुसर्‍या देशात जाणारा महाभाग! | पुढारी

फक्त आंघोळीसाठी दुसर्‍या देशात जाणारा महाभाग!

लंडनः श्रीमंतीची कल्पना करताना बरेच लोक असे म्हणतात की, छोट्या छोट्या कारणांसाठीही विदेश पर्यटन करणे शक्य झाले असते तर किती आपण सुदैवी ठरलो असतो. पण, प्रत्यक्षात असे फारसे होत नाही. अशा परिस्थितीत केवळ आंघोळीसाठी एखादी व्यक्ती बाहेरच्या देशात जाऊन आली, असे सांगितले तर ते थक्क करून जाईल. पण, कॅलम रायन नावाच्या महाभागाने हा पराक्रम देखील गाजवला असून त्याने आंघोळीसाठी इंग्लंड ते हंगेरी, असा विमानाने प्रवास केला आणि आंघोळ करून मायदेशी परतला. आता त्याने इतका सारा आटापिटा का केला व त्याला आर्थिकद़ृष्ट्या हे सारे कसे परवडले, हे रंजक आहे.

मिररने दिलेल्या वृत्तानुसार, युकेमधील कैलम रायनला 4 हजार रुपयांचा खास स्पा घ्यायचा होता. केवळ अंघोळीसाठी केलेला हा आटापिटा कसा योग्य होता, हे त्याने टिकटॉकवर शेअर केले. कैलमने लंडनहून बुडापेस्टमधील ल्यूटन एअरपोर्टची फ्लाईट घेतली आणि विमान लँड झाल्यानंतर थेट सेझेनी बाथ्स गाठले. स्पा घेऊन झाल्यानंतर हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये असलेल्या आपल्या मित्रांना तो भेटला. स्पा मध्ये सकाळी गर्दी कमी असते. त्यामुळे तो तेथे लवकर पोहोचला.

एरवी, लंडनमध्ये स्पा साठी 10 ते 40 हजार रुपये मोजावे लागतात. पण, कैलमला चक्क 4 हजारात स्पा मिळाला आणि येण्याजाण्याचे तिकीट 3 हजार रुपयात मिळाले. अशा तर्‍हेने केवळ 7 हजारांत त्याचा स्पा झाला आणि बुडापेस्टची ट्रीपही झाली. आता केवळ एका आंघोळीसाठी आपण कधी सात हजार रुपये मोजू का, याचे उत्तर `सकृतदर्शनी तर नकारार्थीच येईल!

Back to top button