पुणे : हॉटेलातलं जेवण पडलं तब्बल 79 लाखाला | पुढारी

पुणे : हॉटेलातलं जेवण पडलं तब्बल 79 लाखाला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बांधकाम व्यावसायिक आणि कुटुंबीय बाहेर जेवण्यासाठी गेल्यानंतर सुरक्षारक्षकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने सेनापती बापट रोडवरील बंगला फोडत साडेदहा लाखांच्या रोख रकमेसह तब्बल 79 लाखांचा ऐवज चोरी करून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरक्षारक्षक झंकार बहादूर (रा. नेपाळ) आणि त्याच्या दोन साथीदारांवर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रीतम राजेंद्र मंडलेचा (रा. राजविला बंगलो, मंगलवाडी सोसायटी, सेनापती बापट रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी प्रीतम मंडलेचा हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा सेनापती बापट रोड परिसरात राजविला नावाचा प्रशस्त बंगला आहे. झंकार बहादूरच्या जागेवर यापूर्वी काम करणारा सुरक्षारक्षक सुटीवर गेल्याने झंकार सौद याच्या सुरक्षारक्षक एजन्सीने सौदला बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून नेमले होते. गेल्या दोन महिन्यांपासून तो बंगल्याचा रक्षक म्हणून काम करीत होता. शनिवारी मंडलेचा आणि त्यांचे कुटुंबीय जेवणासाठी रात्री आठ ते दहाच्या दरम्यान बाहेर पडले. याच संधीचा फायदा घेत सौदने त्याच्या अन्य दोन साथीदारांना बंगल्यावर बोलावून घेतले. त्यांनी बंगल्याच्या पाठीमागील दरवाजाचे लॅच तोडून बंगल्यात प्रवेश केला.

सोने, रोख रक्कम लांबविले

चोरट्यांनी घरात शिरून साडेदहा लाखांची रोकड, पाच अंगठ्या, एक हातातील कडा, चार सोनसाखळ्या, दोन ब—ेसलेट, चार सोन्याच्या बांगड्या, दहा लाखांची सोन्याची बिस्किटे, 16 लाखांचा कुंदनहार सेट, 8 लाखांचा कुंदनहार सेट, 4 लाखांचा गळ्यातील हार सेट, दोन सोन्याच्या बांगड्या, गुलाबी सोन्याचा सेट, हिर्‍याचे दागिने, मंगळसूत्र, सोन्याचा निळा पाचू, नेकलेस चोकर, लहान मुलांचे सोने, कानातील फुले असा एकूण 78 लाख 93 हजारांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये एकूण 1 हजार 540 ग्रॅम सोने आणि साडेदहा लाखांच्या रोख रकमेचा समावेश होता.

पोलिस पथके मागावर

मंडलेचा घरी आल्यानंतर घर अस्ताव्यस्त दिसल्याने व सुरक्षारक्षकही नसल्याने चतुःशृंगी पोलिस ठाण्याशी संपर्क साधत याबाबत फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे निरीक्षक अंकुश चिंतामण, उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडीक यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींच्या मागावर पथके रवाना करण्यात आली आहेत.

Back to top button