नाशिक : तस्करी साठी नेल्या जाणाऱ्या 111 उंटाची सुटका

नाशिक : तस्करी साठी नेल्या जाणाऱ्या 111 उंटाची सुटका

नाशिक, (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

शेकडो किलोमीटरचे अंतर पार करीत राजस्थान येथून हैदराबादकडे तस्करीसाठी नेल्या जाण्याच्या संशयावरून १११ उंटांचा ताफा नाशकात अडविल्यानंतर प्राणिमित्रांच्या प्रयत्नांतून सगळ्या उंटांची रवानगी पांजरापोळमध्ये करण्यात आली. इतक्या लांबचे अंतर कापताना त्यातील दोन उंटांचा मृत्यू झाल्याचेही बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील नंदुरबार, सटाणा, वणी यासारख्या इतर ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उंटांचा ताफा बघावयास मिळाल्याने त्याबाबत साशंकता व्यक्त होत होतीच. उंट नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर मंगलरूप गोशाळेचे पदाधिकारी पुरुषोत्तम आव्हाड यांनी तत्काळ याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन व महापालिकेला माहिती दिली. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी १११ उंटांना पांजरापोळच्या सुरक्षित जंगलात घेऊन जाण्याचे आदेश दिले. गुरुवारी (दि. 4) रात्री ८९ व शुक्रवारी (दि. 5) सकाळी २२ अशा एकूण १११ उंटांना पांजरापोळच्या सुरक्षित जंगलात सोडण्यात आले.

नाशकातील तपोवनात गुरुवारी सकाळी ८९ उंट आल्याची माहिती समजल्यानंतर पुरुषोत्तम आव्हाड यांनी मनेका गांधी यांच्याशी संपर्क साधला. मनेका गांधी यांनी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांच्याशी संपर्क केल्यानंतर कारवाईला वेग आल्याचे आव्हाड यांनी सांगितले. आडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इरफान शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. तपोवनात उंटांमुळे अस्वच्छता होऊ शकते, त्यामुळे त्यांची रवानगी चुंचाळे परिसरातील पांजरापोळ जंगलात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तपोवनातून गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास ८९ उंट पांजरापोळ येथे सोडून देण्यात आले. शुक्रवारी सकाळी २२ उंटांची रवानगी पांजरापोळ येथे करण्यात आली. अचानक उंटांचा भला मोठा ताफा आल्याने नागरिकांनी उंट बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली व औद्योगिक वसाहत पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर यांनी बंदोबस्त ठेवला होता. पांजरापोळ येथे पुरुषोत्तम आव्हाड, प्रथमेश चौधरी, गोरक्षक गजू घोडके व पांजरापोळचे व्यवस्थापक सागर आगळे उपस्थित होते.

अशी तस्करी होईल हे कोणालाही वाटले नव्हते. मी याबाबत चौकशी केल्यानंतर उंटांच्या ताफ्यासमवेत असलेल्या ४० लोकांची वेगवेगळी उत्तरे ऐकल्यानंतर मला संशय आला. उंटांना वाचवण्याची धडपड असल्याने मी मनेका गांधी यांच्याशी संपर्क साधला. मनेका गांधी यांचे पूर्ण सहकार्य लाभले असून त्यांच्या मदतीमुळे मोठा आधार मिळाला. पांजरापोळ व्यवस्थापनाशी संपर्क साधत सर्व उंट त्यांच्या जागेत ठेवण्याची विनंती केली आणि त्यांनी त्यास होकार दिला.

– पुरुषोत्तम आव्हाड, मंगलरूप गोशाळा पदाधिकारी

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news