रक्षकच बनला भक्षक ! पुण्यात आयपीएस अधिकाऱ्यानेचं केला विधवेचा विनयभंग; काय आहे प्रकरण ? | पुढारी

रक्षकच बनला भक्षक ! पुण्यात आयपीएस अधिकाऱ्यानेचं केला विधवेचा विनयभंग; काय आहे प्रकरण ?

पुणे; पुढारी वृत्तसेवा : घरकाम करणार्‍या विधवा महिलेशी सोशल साइटच्या माध्यमातून ओळख वाढवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी पुण्यातील एसआयडीत नियुक्त असलेल्या एका आयपीएस अधिकार्‍याविरोधात पुण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला अश्लील व्हिडीओ पाठविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आयपीएस अधिकार्‍यावर गुन्हा दाखल झाल्याने राज्य पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

आयपीएस नीलेश अष्टेकर असा गुन्हा दाखल झालेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात 31 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विनयभंग व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश अष्टेकर हा आयपीएस अधिकारी आहे. तो सध्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पुणे कार्यालयात नियुक्त आहे.

तक्रारदार महिला कळवा (ठाणे) येथे राहते. ती घरकाम करते. तिचे फेसबुकवर अकाउंट असून, या दोघांची त्याद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर फेसबुकवरून त्यांच्यात चॅटिंग व व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही बोलणे सुरू झाले. यानंतर त्याने महिलेला अश्लील मेसेज तसेच व्हिडीओ देखील पाठविले व महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली.

संबंधित पोलिस अधिकारी असल्याने त्या प्रचंड घाबरल्या होत्या. त्यांनी याबाबत तक्रार दिली नव्हती. परंतु, सतत कॉल येत असल्याने त्यांनी नीलेश यामा ब्लॉकही केले होते. पण, नंतर महिला एका वकील महिलेच्या संपर्कात आली. त्यानंतर त्यांनी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

नग्नावस्थेत व्हिडीओ कॉल

दाखल गुन्ह्यात फिर्यादीचा बहिणीचा मुलगा मुंबई येथील पोलिस भरतीमध्ये नापास झाला होता. संशयित आरोपी असलेल्या अष्टेकरने तिच्या बहिणीच्या मुलाला पोलिसात भरती करण्याचे व पीडित महिलेला नोकरी लावण्याचे आश्वासन दिले होते. याचाच फायदा घेत त्याने महिलेला सुरुवातीला मेसेजवरून, नंतर अश्लील भाषेत संवाद साधला; तर नंतर नग्नावस्थेत व्हिडीओ कॉल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच ‘तुला नोकरी हवी असेल, तर मुलीला एक रात्र माझ्याकडे पाठवून दे,’ अशा आशयाचादेखील संवाद साधल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Back to top button