पुण्यातील ऐतिहासिक विश्रामबागवाडा टाकणार कात; पालिकेकडून नूतनीकरणाचे काम सुरू | पुढारी

पुण्यातील ऐतिहासिक विश्रामबागवाडा टाकणार कात; पालिकेकडून नूतनीकरणाचे काम सुरू

हिरा सरवदे

पुणे : दुसरा बाजीराव पेशवा यांनी बांधलेल्या ऐतिहासिक ‘विश्रामबागवाड्या’चे महापालिका प्रशासनाकडून नूतनीकरण करण्याचे काम घेण्यात आले आहे. पुढील वर्षभरात हा वाडा नव्या रूपात पुणेकरांसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. या वाड्यात पुनवडी ते पुण्यनगरी या प्रदर्शनासोबत शहरातील ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती नागरिकांना पाहता येणार आहेत.

पुण्यातील विविध पेठांमध्ये पेशवे काळापासून अनेक वाडे आहेत. या वाड्यांमध्ये शनिवार वाडा, नाना वाडा, विश्रामबागवाडा, भिडेवाडा यांसह काही ऐतिहासिक वाड्यांचाही समावेश आहे. दुसर्‍या बाजीरावांनी राहण्यासाठी म्हणून 1807 मध्ये 2 लाख रुपये खर्चून विश्रामबागवाडा बांधला होता. वाडा बांधण्यासाठी 6 वर्षे लागली. वाड्याची ही वास्तू 39 हजार चौरस फुटांची आहे. वाड्याचे बांधकाम हे विटांचे आहे.

संपूर्ण वाड्यात सुरु व सागाच्या लाकडांचा वापर केलेला आहे. तीन चौक असणारा हा प्रशस्त वाडा असून, चारही बाजूंनी मोकळा असा मोठा चौक येथे आहे. या वाड्याला पेशवे व इंग्रज धाटणीच्या बांधकामाचे स्वरूप दिसून येते. हा वाडा 1921 साली महापालिकेने 1 लाख रुपये देऊन ताब्यात घेतला. त्यानंतर त्यात महापालिकेने ’पुनवडी ते पुण्यनगरी’ प्रदर्शन, बहुतांश मोठा भाग पोस्ट ऑफिस आणि वरील मजला शासकीय ग्रंथालयासाठी वापरण्यात येत होता.

दरम्यान, या वाड्याचे बांधकाम जुने झाल्याने आणि त्याची पडझड झाल्याने महापालिकेने शासकीय ग्रंथालयाचे स्थलांतर करून त्याच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. वाड्यातील दोन चौकांच्या नूतनी करणाचे काम पूर्ण झाले आहे. आणखी समोरील बाजू, पहिला मजला, पुनवडी ते पुण्यनगरी प्रदर्शनाच्या हॉलचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. सध्या छतावरील कौले बदलण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी चालू आर्थकि वर्षामध्ये सव्वा कोटीची तरतूद करण्यात आली आहे. संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी साडेतीन ते चार कोटी रुपये लागणार असल्याचे महापालिकेच्या भवन विभागाने सांगितले.

मेघडंबरीचेही होणार नूतनीकरण

विश्रामबाग वाड्याचा दर्शनी भागातील मेघडंबरीचे आतापर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात आले नव्हते. मात्र, ऊन, वारा व पावसामुळे मेघडंबरीचा दर्शनी भाग खराब झाला आहे. त्यामुळे तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नूतनीकरण केले जाणार आहे. यासाठी सागवानाचे जुने लाकूड वापरले जाणार आहे. तसेच जुन्या मेघडंबरीवर जी कलाकुसर आहे, तशीच कलाकुसर (कार्वगिं) त्यावर कारागिराकडून करून घेतली जाणार आहे. जुने आणि नवीन लाकूड एकसारखे दिसण्यासाठी मेलॅमाईन पॉलिस करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या हेरिटेज विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील मोहिते यांनी सांगितले.

ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती पाहता येणार

विश्रामबाग वाड्यात ज्या ठिकाणी शासकीय ग्रंथालय होते, त्या हॉलमध्ये शहरातील वर्ग एकमधील ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये मंडईची जुनी इमारत, विद्यापीठ, फर्ग्युसन कॉलेज, ससून हॉस्पिटल, महादजी शिंदे यांची छत्री, कृषी महाविद्यालय अशा विविध वास्तूंचा समावेश असणार आहे. या वास्तू पर्यटकांना पाहता येणार आहेत.

विश्रामबाग वाड्याची मेघडंबरी ही सुशोभीकरणाचा भाग असला, तरी त्या काळातील स्थापत्य कलेची साक्ष देणारी आहे. या मेघडंबरीसाठी टणक आणि टिकाऊ असलेल्या एैन व सागवानी लाकूड, लाकडी सुरुचे खांब, लगाव, तुळई आदींचा वापर करण्यात आला आहे. मेघडंबरीच्या वरील कडावर कोरीव काम करून मगर, पंख असलेली सुसर आहे. हा वाडा पेशवे काळातील शेवटचा वाडा आहे.

                                          – मंदा खांडगे, वाडा संस्कृतीच्या अभ्यासक.

विश्रामबागवाड्याचा जो भाग खराब झाला आहे, तो काढून संपूर्ण भाग नव्याने केला जाणार आहे. यासाठी लाकडी बांधकाम शैलीचा वापर केला जाणार आहे. शिवाय या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा व स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. हे सर्व काम चालू आर्थकि वर्षात पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

                             – हर्षदा शिंदे, विभागप्रमुख, हेरिटेज विभाग, महापालिका

Back to top button