पिंपळनेर : 'आपला दवाखाना' चे आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते लोकार्पण | पुढारी

पिंपळनेर : 'आपला दवाखाना' चे आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते लोकार्पण

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखान्याचे’ लोकार्पण आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते साक्री तालुक्यातील कळंभीर आरोग्य उपकेंद्रात करण्यात आले. ‘आपला दवाखाना’ सुविधेचा लाभ गोरगरीब, वाड्यावस्त्यांमधील रूग्णांनी घेण्याचे आवाहन आमदार मंजुळा गावीत यांनी याप्रसंगी केले.

‘आपला दवाखाना’ लोकार्पणप्रसंगी पंचायत समिती साक्रीचे सभापती शांताराम कुवर, उपसभापती देसले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी बोडके, गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, साथरोग वैद्यकीय अधिकारी मोरे, जि. प. सदस्य पोपटराव सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी गायकवाड, कर्मचारीवृंद व पत्रकार बांधव उपस्थित होते. ग्रामीण भागातील गोरगरीबांना आरोग्य सुविधा मिळाव्यात. या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतील ‘आपला दवाखाना’ येथे बाह्यरूग्ण सेवा, मोफत तपासणी, मोफत औषधोपचार, लसीकरण, टेली कंन्स्लटेशन आदी सुविधा उपलब्ध होणार आहे. आवश्यकतेनुसार फिजीशियन, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ बालरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञांची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कळंभीर आरोग्य उपकेंद्र येथे सुरू केलेल्या ‘आपला दवाखाना’ येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कळंभीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बेडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या समवेत बहुउद्देशीय कर्मचारी (आरोग्य) स्टाफ नर्स आणि मदतनिस रहाणार असल्याचे आमदार मंजुळा गावीत यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button