Anganwadi : अंगणवाड्यांना मिळेना हक्काचं अंगण! शाहुवाडी तालुक्यात १३७ इमारती बांधकामाच्या प्रतीक्षेत | पुढारी

Anganwadi : अंगणवाड्यांना मिळेना हक्काचं अंगण! शाहुवाडी तालुक्यात १३७ इमारती बांधकामाच्या प्रतीक्षेत

विशाळगड; सुभाष पाटील : शाहुवाडी तालुक्यातील १३७ अंगणवाड्यांना (Anganwadi) अद्यापही हक्काचे छप्पर मिळाले नाही. या अंगणवाड्या सध्या मंदिर, समाजाचे सभागृह, खासगी इमारत, प्राथमिक शाळा या ठिकाणी भरविल्या जात आहेत. खासगी संस्थांच्या तुलनेने अंगणवाडीकडेच सामान्य नागरिकांचा ओढा असल्याने शासनाने अंगणवाड्यांसाठी हक्काची इमारत बांधण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. मंजूर ३२५ अंगणवाड्यांपैकी १३७ अंगणवाड्यांना स्वमालकीची इमारत नसल्याने अंगणवाड्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

शाहुवाडीला शैक्षणिक परंपरा लाभलेली आहे. खासगी शाळांचे पेव फुटले असले तरी विशेषत: ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य पालक आपली मुले अंगणवाड्यांमध्येच आपल्या पाल्यांना दाखल करत असतात. अंगणवाड्यांमध्ये शिक्षणासोबतच मोफत पोषक असा शालेय पोषण आहार दिला जातो. त्यामुळे कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी अंगणवाड्या वरदान ठरतात. जिल्हा परिषदेच्या बालविकास विभागाच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी पोषण आहारावर खर्च केला जातो. तालुक्यांमध्ये ३ हजार ४८१ इतके विद्यार्थी अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना ३१८ अंगणवाडी सेविका व २५६ मदतनीस ज्ञानदानाचे काम करत आहेत. (Anganwadi)

बालकांमध्ये शालेय शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, बालके कुपोषित राहू नयेत, तसेच प्राथमिक पूर्व शिक्षण देण्याच्या उद्देशाने अनौपचारिक शिक्षण देण्यासाठी केंद्रशासनाने अंगणवाड्यांची निर्मिती केली. तालुक्यातील ३२५ अंगणवाड्यांपैकी ७२ अंगणवाड्या खाजगी जागेत, ८ अंगणवाड्या ग्रामपंचायत इमारतीत, १८ अंगणवाड्या समाजमंदिरात तर ३९ अंगणवाड्या प्राथमिक शाळेत, १८८ अंगणवाड्या स्वमालकीच्या जागेत भरवल्या जात असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी स्नेहल माने यांनी दिली.
तालुक्यातील अनेक अंगणवाड्या घरात, ग्रामपंचायत इमारतीत, समाज मंदिरात, प्राथमिक शाळेत, असुरक्षित ठिकाणी, पडीक जागेत भरतात. काही चक्क झाडाखाली, व्हरांड्यात भरतात. समाज मंदिर व देवळात भरणाऱ्या अंगणवाड्यांना देवाच्या वारादिवशी देवदर्शनाच्या निमित्ताने ग्रामस्थांची गर्दी होत असल्याने याचा त्रास सेविका व मदतनीस तसेच विद्यार्थ्यांना होतो. तसेच सामाजिक सभागृहात भरणाऱ्या अंगणवाड्यांना लग्न, बारशे, जावळ आणि राजकिय कार्यक्रमाच्या निमित्ताने सुट्टी देतात. (Anganwadi)

तालुक्यातील अनेक अंगणवाड्या अंधाऱ्या जागेत, घाणीचे साम्राज्य, स्वच्छतेचा अभाव असणाऱ्या जागेत आहेत. अनेक अंगणवाड्यांना स्वमालकीची इमारत नसल्यामुळे खेळण्यासाठी पुरेशी जागा नाही. काही अंगणवाड्या रहदारीच्या रस्त्याच्या कडेला आहेत. त्यामुळे मुलांना खेळावयास सोडणे म्हणजे अपघातास आमंत्रण होय. तालुक्यातील स्वमालकीच्या इमारतीपैकी अनेक इमारती सुस्थितीत नाहीत. पावसाळ्यात यातील काही अंगणवाड्या बंद करून मुलांचे शिक्षण, संस्कार थांबवावे लागते.

सध्या १८८ अंगणवाड्यांना हक्काच्या इमारती आहेत. शासनाच्या निधीतूनच या इमारतींची डागडुजी केली जाते. मात्र, खासगी जागांतील इमारतींमध्ये गैरसोयींचा सामना करावा लागतो. या खासगी इमारतींच्या बाजूला असणारी अस्वच्छता, आजूबाजूचा गोंधळ यामुळे शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होताना दिसतो. तसेच या मुलांना याच बकाल परिस्थितीमध्ये पोषण आहार खावा लागतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे तीन-तेरा वाजतात. या पार्श्वभूमीवर हक्काच्या इमारतीत अंगणवाड्या गेल्या तर तेथील शिक्षणाचा दर्जा सुधारणे शक्य होऊ शकते.

तालुक्यातील अंगणवाड्यांची सद्यस्थिती-

  • एकूण मंजूर अंगणवाडया : ३२५
  • स्वमालकीच्या इमारतीत असलेल्या : १८८
  • स्वमालकीच्या इमारती नसलेल्या : १३७
  • खाजगी जागेत असलेल्या : ७२
  • ग्रामपंचायत इमारतीत : ८
  • प्राथमिक शाळेत : ३९
  • समाज मंदिर :१८
  • एकूण विद्यार्थी : ३४८१
  • सेविका : ३१८
  • मदतनीस : २५६

अधिक वाचा :

Back to top button