नाशिक : वेगळ्या पंगतीची प्रथा अखेर संपुष्टात; अंनिसचा पाठपुरावा | पुढारी

नाशिक : वेगळ्या पंगतीची प्रथा अखेर संपुष्टात; अंनिसचा पाठपुरावा

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
अनेक वर्षांपासून ग्रामदेवता महादेवीच्या गावजेवणावळीत आयोजित केल्या जाणार्‍या वेगळ्या पंगतीची परंपरा यंदापासून थांबविण्यात आली. अंनिसचे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष संजय हरळे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर त्र्यंबकेश्वरमधील सर्व समाजाच्या धुरिणांनी दाखवलेल्या समजूतदारपणाबद्दल जिल्हा तसेच पोलिस प्रशासन आणि अंनिसने समाधान व्यक्त केले.

ग्रामदेवता महादेवी मंदिरात दरवर्षी चैत्र अथवा वैशाख महिन्यात संपूर्ण गावातून वर्गणी काढून जेवणावळ दिली जाते. यामध्ये जवळपास 10 हजार ग्रामस्थ जेवण करतात. येथे सर्व समाजासाठी एकत्र पंगत होत होती. मात्र, गावात विशिष्ट समाजाची व इतर समाजाची वेगळी तसेच काही व्यक्ती व त्यांचे कुटुंबीयांनीदेखील स्वतंत्र पंगतीची परंपरा सुरू केली होती. त्यामुळे गावात सामाजिक भेदाभेद वाढीस लागल्याचा दावा अंनिसने केला होता. तसेच याबाबत अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, अ‍ॅड. समीर शिंदे, कार्याध्यक्ष त्र्यंबकेश्वर संजय हराळे यांनी तहसीलदारांची भेट घेत पंगतीमध्ये जातिभेद थांबविण्याची मागणी केली. याची तहसीलदारांनी गंभीर दखल घेत त्र्यंबक पोलिस ठाण्याला याबाबत कार्यवाहीबाबत कळविले होते. पोलिसांनी महादेवी मंदिर ट्रस्ट सदस्यांना ही प्रथा थांबविण्याबाबत लेखी पत्र दिले होते. त्यानंतर ही प्रथा बंद करून संपूर्ण गावाने एकत्र पंगत घेत नवा आदर्श घालून दिला आहे. गावातील सर्वच समाजांतील नागरिकांनी प्रसादासाठी एकत्र पंगतीत बसण्याचा निर्णय घेतला व गावातील एकोपा अबाधित राहील याला प्राधान्य दिले.

देवी मंदिरात यज्ञ करणारे पुजारी सोवळ्यात नैवेद्य करून प्रसाद करतात. त्यानंतर ते सोवळ्यात जेवण करतात. धार्मिक कार्यक्रमात पुजारी सोवळे पाळतात हे सर्वत्र आहे. मात्र, त्यास आक्षेप घेतल्याने ट्रस्टने गावजेवणाची एकच पंगत करत गावचा एकोपा बिघडणार नाही यासाठी सामंजस्य दाखवले. – महेंद्र बागडे, विश्वस्त, महादेवी मंदिर ट्रस्ट.

हेही वाचा:

Back to top button