आम्ही बिनशर्त माफी मोठ्या मनाने स्वीकारतो : सर्वोच्च न्यायालयाने ललित मोदींचा ‘माफीनामा’ स्वीकारला | पुढारी

आम्ही बिनशर्त माफी मोठ्या मनाने स्वीकारतो : सर्वोच्च न्यायालयाने ललित मोदींचा 'माफीनामा' स्वीकारला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : “आम्‍ही बिनशर्त  मागितलेली माफी मोठ्या मनाने स्‍वीकारतो. न्‍यायालय नेहमीच माफीवर अधिक विश्‍वास ठेवते. विशेषत: जेव्‍हा माफी बिनशर्त आणि मनापासून मानली असेल तर आम्‍ही न्‍यायालय अवमान प्रकरणाची कारवाई बंद करतो, असे स्‍पष्‍ट करत सर्वोच्‍च न्‍यायालयाने इंडियन प्रिमियर लीगचे (आयपीएल ) माजी अध्‍यक्ष ललित मोदी यांच्‍यावरील अवमान कारवाई रद्द केली.

ललित मोदी यांनी भारतीय न्यायव्यवस्थेविरुद्ध टिप्‍पणी करणारी पोस्‍ट सोशल मीडियावर पोस्‍ट केली होती. याविरोधात ज्‍येष्‍ठ वकील उद्‍य सिंह चंदर यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्‍यायमूर्ती एम.आर. शाह आणि न्‍यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

न्‍यायालयाच्‍या अवमान प्रकरणी ललित मोदींनी मागितली बिनशर्त माफी

ललित मोदी यांच्‍या वतीने युक्‍तीवाद करताना ज्‍येष्‍ठ वकील डॉ. ए. एम. सिंघवी म्‍हणाले की, “ललित मोदी यांनी १७ एप्रिल २०२३ रोजी सोशल मीडियावरील पोस्टसाठी बिनशर्त माफी मागणारे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशाचे पालन करून, ललित मोदींनी ट्विटरवर तसेच वर्तमानपत्रांमध्ये माफीनामा प्रकाशित केला आहे. संबंधित पोस्ट  लगेचच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हटवण्यात आली होती. ती आता उपलब्ध नाही. ललित मोदी यांनी सादर केलेला बिनशर्त माफीनामा  प्रामाणिक आहे.”

माफीनाम्यात ललित मोदी म्ह‍णतात…

आपल्‍या माफीनाम्‍यात ललित मोदी यांनी म्‍हटलं होतं की, मी १३ जानेवारी २०२३ ते ३० मार्च २०२३ या कालावधी केलेल्‍या माझ्या ट्विटसाठी बिनशर्त जाहीर माफी मागतो. भारतीय न्यायव्यवस्था आणि माननीय न्यायालयांचे वैभव आणि प्रतिष्ठेशी विसंगत असे कोणतेही काम मी करणार नाही. भारतीय न्यायपालिकेची प्रतिमा मलिन माझा करण्याचा हेतू नव्हता.”

न्यायालय नेहमीच माफीवर अधिक विश्वास ठेवते

यायमूर्ती एम.आर. शाह आणि न्‍यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्‍या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, आम्ही बिनशर्त माफी मोठ्या मनाने स्वीकारतो कारण न्यायालय नेहमीच माफीवर अधिक विश्वास ठेवते. मात्र भविष्यात संबंधिताकडून भारतीय न्यायव्यवस्था आणि न्यायालयांची प्रतिमा मलीन करण्‍याचा प्रयत्‍न झाल्‍यास त्याकडे गांभीर्याने पाहिले जाईल, असा इशाराही खंडपीठाने यावेळी दिला.  ललित मोदींच्‍या विरोधात याचिका दाखल करणारे ज्येष्ठ वकील श्री रणजित कुमार यांनी सांगितले की, वृत्तपत्रांमध्ये प्रसारित झालेल्या माफीनाम्यात, मोदींनी भविष्यात आपल्या कृत्याची पुनरावृत्ती करण्यापासून परावृत्त होईल असे सूचित केलेले नाही. मात्र न्यायमूर्ती एम. आर. शहा यांनी प्रतिज्ञापत्रात त्‍यांनी याचा उल्लेख केला असून, तो पुरेसा असल्याचे स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

 

Back to top button