पाथर्डी: अनधिकृत झेंड्यांवर कारवाई, नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी काढले झेंडे; खबरदारी म्हणून उपाययोजना | पुढारी

पाथर्डी: अनधिकृत झेंड्यांवर कारवाई, नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी काढले झेंडे; खबरदारी म्हणून उपाययोजना

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा: झेंड्यावरून दोन गटात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत सर्व झेंडे काढण्याचे आदेश पोलिस विभागाने नगरपरिषदेला दिले होते. यामुळे परिषदेने असे झेंडे काढायला सुरुवात केली आहे.

झेंड्यावरून शेवगाव शहरात शनिवारी (दि.22) दोन गटात तणाव निर्माण झाला होता. त्याची पुनरावृत्ती पाथर्डी शहरात होऊ नये याची खबरदारी म्हणून रस्त्यावरील पथ दिव्यांवरील झेंडे व अनधिकृत झेंडे नगरपरिषदेने काढून घेतले आहे. या मोहिमेला सुरुवात झाली आहे. राजकीय,विविध सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम, जयंती, पुण्यतिथी सोहळ्यासाठी आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक ठिकाणी झेंडे लावले जातात. यामध्ये विविध रंगाचे झेंडे असतात, अशा सर्व रंगांचे झेंडे रविवारपासून नगरपरिषद कर्मचार्‍यांकडून काढायला सुरुवात केली. विविध जयंत्या व धार्मिक उत्सवानिमित्त शेवगाव शहरात पूर्वी लावलेल्या झेंड्यांमुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून सायंकाळी सर्व झेंडे काढून टाकल्याने वातावरण निवळले. याच पाशर्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व झेंडे काढण्याच्या मोहिमेला सुरुवात केली.

पाथर्डी शहरातील शेवगाव रस्ता,नगर रस्ता, कोरडगाव रस्ता, चिंचपूर रस्ता या मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी असलेेले पथ दिव्यांवरील सर्व प्रकारचे झेंडे काढून नगरपरिषदेने जमा करून घेतले. त्याचप्रमाणे खासगी व सरकारी जागेवर अनधिकृत लावलेले झेंडे नगरपरिषदने उतरून घेतले. अनधिकृत झेंडे नगरपरिषद काढून घेत मोहीम सुरू ठेवणार आहे.

राजकीय, सामाजिक, जयंती व पुण्यतिथी निमित्त विविध रंगाचे झेंडे लावले जातात. त्याची रीतसर परवानगी नगरपरिषदेकडून घेणे बंधनकारक आहे. पोलिसांकडून अनधिकृत झेंडे काढण्याबाबत पत्र प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने झेंडे काढण्याची कारवाई केली गेली. अजून ज्या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे. तो कार्यक्रम पूर्ण झाल्यावर तेथील झेंडेही काढून घेतले जातील.
-संतोष लांडगे, मुख्याधिकारी नगरपरिषद, पाथर्डी

Back to top button