जळगाव : पुढारी वृत्तसेवा
नविन वीज मीटर जोडणीसाठी दीड हजार रूपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या टेक्नीशीयनसह खासगी साथीदाराला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील वीज कंपनी कार्यालयाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारदाराने महावितरण कंपनीकडे रीतसर वीज मीटर घेण्यासाठी अर्ज केला. त्यानुसार सिनीअर टेक्नीशीयन विनोद उत्तम पवार आणि खासगी साथीदार कलीम तडवी यांनी डिमांड नोट भरण्यासाठी दोन हजार रूपये घेतले. मात्र वीज मीटर लावून दिले नाही. तर वीज मीटर लावण्यासाठी पुन्हा दीड हजाराची लाच मागितली. त्यामुळे अखेर तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार तक्रारीची पडताळणी करुन एसीबीने बुधवारी (दि. १९) दुपारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात सापळा रचला. त्यानंतर सिनीअर टेक्निशीयन विनोद उत्तम पवार आणि त्याचा खासगी साथीदार कलीम तडवी या दोघांना तक्रारदारकडून दीड हजाराची लाच घेतांना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.