नाशिक : छात्राच्या मृत्यू प्रकरणी एनसीसी शिक्षकाला शिक्षा | पुढारी

नाशिक : छात्राच्या मृत्यू प्रकरणी एनसीसी शिक्षकाला शिक्षा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय छात्र सेनेच्या शिबिरादरम्यान शिक्षकाच्या हातून गोळी सुटल्याने मृत्यू झालेल्या पराग देवेंद्र इंगळे या विद्यार्थ्याला दहा वर्षांनंतर न्याय मिळाला. संबंधित शिक्षकाला सात वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पुणे न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल सुनावला.

मालेगाव तालुक्यातील लखाणे येथील देवेंद्र इंगळे यांचा मुलगा पराग हा लॉयला शाळेत (पुणे) येथे शिक्षण घेत होता. एनसीसीच्या शिबिरांतर्गत शिवाजीनगरच्या एससीसी मुख्यालय मैदानावर तो दि. 1 फेब्रुवारी 2013 रोजी गोळीबार प्रशिक्षणासाठी गेला होता. तेव्हा एनसीसी शिक्षक अमोल घाणेकर यांच्या हातातील रायफलमधून गोळी सुटून ती परागच्या कपाळातून आरपार गेल्याची घटना घडली होती. 7 जानेवारी 2016 पर्यंत पुणे येथील वानवडी सैन्य हॉस्पिटलमध्ये त्यावर उपचार चालले. 7 जानेवारी 2016 रोजी तो गतप्राण झाला. पितृकगावी शासकीय इतमामात त्यावर अंत्यसंस्कार झाले होते. दरम्यान, डेक्कन पोलिस ठाण्यात शिक्षक घाणेकर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. संबंधिताची केवळ मुुलांना सरावाठिकाणी आणून सैन्य दलाच्या अधिकार्‍यांशी ओळख करून देणे एवढीच जबाबदारी होती. त्यानंतर अनाधिकाराने झोपून सराव करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभा राहून त्याने गोळीबार केला होता. ज्यावेळी पराग काडतूस गोळा करत होता, तेव्हा त्या शिक्षकाच्या बंदुकीतून निसटलेली गोळी परागला भेदून गेली होती. या खटल्याचे प्रदीर्घ कामकाज चालले. अनावधानाने घटना घडल्याने सदोष मनुष्यवधाचे कलम वगळावे, अशी मागणी झाली होती. परंतु, न्यायालयाने तो अर्ज फेटाळला होता. सरकारी पक्षातर्फे राजेश कावेडिया यांनी बाजू मांडली. अ‍ॅड. संजय कदम यांनी कुठलीही फी न घेता दहा वर्षे या प्रकरणाचा पाठपुरावा केला. 17 साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली. 13 एप्रिल 2023 रोजी न्यायाधीश जाधव यांनी निकाल दिला. आरोपी घाणेकर यांना तीन गुन्ह्यांपोटी सात वर्षांचा सश्रम कारावास आणि न्यायप्रक्रियेत विलंब व्हावा, यासाठी विनाकारण गुंतागुंत निर्माण केल्याबद्दल दोन लाख आणि आई-वडिलांच्या झालेल्या मनस्तापापोटी तीन लाख रुपये असा पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला.

अशी वेळ कुणावरही येऊ नये
मुलाने तीन वर्षे मृत्यूशी झुंज दिली. न्याय प्रक्रियेस एका तपाचा विलंब झाला. मुलगा गमावण्याचे दु:ख मोजले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले. या घटनेने संपूर्ण कुटुंबाची भावनिक ओढाताण झाली, असा प्रसंग जगात कुणावरही येऊ नये, हीच प्रार्थना असल्याचे परागचे वडील देवेंद्र म्हणाले.

हेही वाचा:

Back to top button