परराज्यातील आंब्यांवर भिस्त; अक्षय्यतृतीयेला हापूसच्या उत्पादनात घट | पुढारी

परराज्यातील आंब्यांवर भिस्त; अक्षय्यतृतीयेला हापूसच्या उत्पादनात घट

पुणे : अवकाळी पावसानंतर उन्हाच्या चटक्याने हापूस आंब्याचे उत्पादन घटून आवकही कमी झाली आहे. परिणामी, हापूसचे दर आवाक्याबाहेर असल्याने यंदा सर्वसामन्यांना अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर आपली चव कर्नाटकच्या आंब्यावरच भागवावी लागणार आहे. एकंदरीतच पुणेकरांना हापूसपेक्षा स्वस्त असलेल्या परराज्यातील आंब्यांवर यंदा समाधान मानावे लागणार आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्यतृतीयेचा सण पाच दिवसांवर आला आहे. या दिवशी घरोघरी पुरणपोळीचे सुग्रास जेवण व आमरसाच्या पंगती दिसून येतात. दरवर्षी या काळात मुबलक आंबा बाजारात उपलब्ध होऊन त्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतात. यंदा मात्र हवामानातील बदल आणि अवकाळी पावसाने उत्पादन खराब होण्याच्या भीतीने शेतकर्‍यांनी वेळेआधीच आंब्याची तोडणी केली.

त्यामुळे, गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दरवर्षीपेक्षा अधिक आंब्याची आवक होत होती. या काळात एरवीच्या तुलनेत दर खाली आले होते. मात्र, त्यानंतर तापमानात वाढ झाली. तापमान 38 ते 39 अंशांवर गेल्याने झाडावरील कैर्‍या पिवळ्या होऊन जमिनीवर पडल्या. परिणामी, बाजारातील आवक सध्या कमी झाल्याचे हापूसचे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.

पेटीमागे 500 रुपयांनी वाढ
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात शुक्रवारी हापूस आंब्याच्या 2 हजार 500 ते 3 हजार पेट्यांची आवक झाली. कच्च्या हापूसच्या 4 ते 7 डझनाच्या पेटीला 2 हजार 500 ते 4 हजार 500 रुपये भाव मिळाला. अक्षय्यतृतीयेच्या पार्श्वभूमीवर मागणी जास्त मात्र आवक कमी असल्याने पेटीमागे भावात 500 रुपयांची वाढ झाली. सध्या बाजारात तयार आंब्याच्या 4 ते 7 डझनाच्या पेटीला 3 ते 5 हजार रुपये भाव मिळत आहेत. तर किरकोळ बाजारात 700 ते 1200 रुपये डझन या दराने हापूसची विक्री सुरू आहे.

 

Back to top button