पिंपरी : पालिकेच्या इतर अधिकार्‍यांच्याही लवकरच बदल्या? | पुढारी

पिंपरी : पालिकेच्या इतर अधिकार्‍यांच्याही लवकरच बदल्या?

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त, सहायक आयुक्त अशा एकूण 18 अधिकार्‍यांचे विभाग आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि.13) अचानक बदलले आहेत. आता उर्वरित अधिकार्‍यांची बदल्या कधी होणार अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. त्याचा बदल्याचा मुहूर्त मे महिन्यात असल्याचे सुत्रांनी सांगितले.

तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी उपायुक्त, सहायक आयुक्तांसह सर्वच कर्मचार्‍यांचा बदल्या केल्या होता. राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर आयुक्त सिंह यांनी गेल्या आठवड्यात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्याचा निर्णय घेतला. संबधित अधिकारी कामगिरी लक्षात घेऊन आयुक्तांनी या बदल्या केल्याचे बोलले जात आहे. अकार्यक्षम अधिकार्‍यांना कमी दर्जाचे विभाग देण्यात आले आहेत. तर, चांगले काम करणार्‍या अधिकार्‍यांकडे पूर्वीचे विभाग कायम ठेवण्यात आले आहेत.

तर, काही अधिकार्‍यांकडे अधिक विभाग देऊन जबाबदारी वाढविण्यात आली आहे. अचानक झालेल्या या बदल्यामुळे कमी दर्जाचे विभाग मिळाल्याने काही अधिकारी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. तर, काही अधिकारी रजेवर गेले आहेत. महत्त्वाचे विभाग मिळाल्याने आनंदीत असलेल्या संबंधित अधिकार्‍यांनी त्या विभागाचा सोमवारी (दि.17) पदभार स्वीकारला.

आता, पालिकेच्या उर्वरित अधिकार्‍यांच्या बदल्या कधी होणार? याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. एकाच ठिकाणी अनेक वर्षापासून ठाण मांडलेल्या आणि अकार्यक्षम अधिकार्‍यांची दुसर्‍या ठिकाणी बदली करावी, अशी मागणी दबक्या आवाजात केली जात आहे. या बदल्या पुढील मे महिन्यात केल्या जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Back to top button