केंद्र सरकारचा ओबीसी आरक्षणाला विरोध; धनंजय मुंडे यांची टीका | पुढारी

केंद्र सरकारचा ओबीसी आरक्षणाला विरोध; धनंजय मुंडे यांची टीका

धुळे, पुढारी वृत्तसेवा

‘केंद्रातील सरकार ज्या विचारांचे आहे. त्या विचारांना ओबीसी आरक्षण मान्य आहे का, हा प्रश्न मी पहिल्या दिवसापासून विचारतो आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी भाजपच्या केंद्र व तत्‍कालिन राज्य सरकारने डेटा दिला नसल्याची बाब या समाजाला कळली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला विरोध कोणाचा आहे याची जाणीव आता ओबीसी समाजाला झाली आहे, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

धुळे जिल्ह्यातील साक्री येथे मेळाव्यापूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी ओबीसी आरक्षणावरून भाजपवर टीकास्त्र सोडले. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात गेला. त्यावेळी राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार होते. या सरकारने एम्पेरियल डेटा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. हा डेटा दिला नाही. त्यामुळे आरक्षण देण्याच्या विरोधात कोण आहे, याची जाणाीव ओबीसी समाजाला झाली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

बीड येथील एसटी कर्मचार्‍याने केलेली आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणी काही बाबी तपासणे सुरू आहे. राज्यात जून व जुलै महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे परिस्थिती खराब असतांना वीज कंपनीने वीज जोडण्या तोडल्या नाही. त्यामुळे या आत्महत्येची कारणे तपासली जात असून त्यावर उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर दोन पोलीस लक्ष ठेवत असल्याचे सांगितले जाते आहे. या विषयी पोलिसांकडे तक्रार केली असेल तर तपास केला जाईल, असेही ते म्‍हणाले. आपत्ती प्रतिसाद निधीच्या यादीतून बीडचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याची माहिती चुकीची आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचलं का? 

Back to top button