अट्टल दरोडेखोरांच्‍या 'सिनेस्टाईल' मुसक्या आवळल्या; किन्हवलीजवळ पोलिसांवर हल्‍ल्‍याचा प्रयत्‍न | पुढारी

अट्टल दरोडेखोरांच्‍या 'सिनेस्टाईल' मुसक्या आवळल्या; किन्हवलीजवळ पोलिसांवर हल्‍ल्‍याचा प्रयत्‍न

कसारा : पुढारी वृत्तसेवा

पुणे, सातारासह विविध ठिकाणी जबरी चोऱ्या, घरफोडी केलेल्‍या अट्टल दरोडेखोरांच्‍या ‘ सिनेस्टाईल’ मुसक्या आवळल्या. ही थरारक कामगिरी शहापूर पोलिसांनी केली. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न करत जंगलात पळून जाण्‍याचा प्रयत्‍न केला. पोलिसांनी थरारक पाठलाग करत दोन दरोडेखोरांच्‍या ‘ सिनेस्टाईल’ मुसक्या आवळल्या. दरम्‍यान, ही टोळी आंतरराज्‍य असल्‍याचे प्राथमिक तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

पुणे, सातारासह विविध ठिकाणी जबरी चोऱ्या, घरफोडीसह विविध गुन्‍हे करुन पसार झालेली टोळी शहापूर तालुक्‍यातील किन्‍हवली भागात असल्‍याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली होती. त्‍यानुसार, ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार उपासे,गजेंद्र पालवे, श्रीकांत जाधव, पी.एस आय विकास निकम, स्थानिक गुन्हे शाखेचे भास्कर जाधव व पोलीस कर्मचारी पोलीस नाईक लिलके,मनोज सानप, सुरेश खडके , शशिकांत दिघे यांनी नाकाबंदी केली. पथकाने पुण्याकडे जाणाऱ्या किन्हवली रस्त्याकडे आपले शोध कार्य सुरु केले.

दरोडेखोरांचा पोलिसांवर हल्‍ल्‍याचा प्रयत्‍न

किन्हवलीजवळ एक जीप मुरबाड रोडकडे जाताना पोलिसांना दिसून आली. पोलिसांनी तिचा पाठलाग सुरु केला. दरोडेखोरांनी पोलिसांना हुलकावणी देण्‍याचा प्रयत्‍न केला. पोलिसांनी गाडीला ओव्हरटेक केले. गाडीतील 5 जणांनी पोलिसांवर हल्ला करण्‍याचा प्रयत्‍न केला. पोलिसांशी झटापटी केली.गाडी सोडून जंगलात पळून जाण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र पोलिसांनी रात्रीच्या किर्रर्र अंधारात त्यांचा पाठलाग करत दोन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

शकील अहमद,आझाद सलमानी ( रा. उत्तर प्रदेश ) असे जेरबंद केलेल्‍या दरोडेखोरांचे नाव आहे. दोघांना सातारा पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्‍यात येणार असून विविध गुन्ह्यांची माहिती उघड होणार असल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलं का?

 

Back to top button