जुन्नरच्या वर्दळीच्या ठिकाणी अतिक्रमण वाढले | पुढारी

जुन्नरच्या वर्दळीच्या ठिकाणी अतिक्रमण वाढले

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर शहरातील नेहमी वर्दळ असलेल्या धान्यबाजार- नेहरूबाजार या सार्वजनिक रस्त्यावर किरकोळ भाजीविक्रेते, फळविक्रेते, हातगाडीचालक यांचे अतिक्रमण वाढले आहे. यामुळे पायी चालणारे नागरिक तसेच दुचाकी, चारचाकीचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, नगरपरिषद व पोलिस प्रशासनाकडून याबाबत कारवाई होताना दिसून येत नसल्याने दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

जुन्नर नगरपरिषदेच्या चार व्यापारी संकुलांसह तहसील कार्यालय आणि विविध शासकीय कार्यालयाकडे तसेच शाळा, महाविद्यालय, बसस्थानकाकडे ये-जा करण्याकरिता धान्यबाजार, नेहरू बाजार हा महत्त्वाचा रस्ता आहे. यामुळे या भागात दिवसभर मोठी वर्दळ असते. परंतु याच रस्त्यावर भाजीपाला, फळ विक्रेते, हातगाडीचालक तसेच पथारी व्यावसायिक ठाण मांडून बसलेले असतात.

यामुळे वाहतुकीला नेहमीच अडथळा येऊन अनेकदा या भागांत वाहतुकीची कोंडी होते. परंतु या भागातील सार्वजनिक जागा आमच्या व्यवसायाकरिता हक्काची जागा असल्याच्या भावनेतून हे सर्व विक्रेते या रस्त्यावर बिनधास्तपणे आपले व्यवसाय करीत असतात. नगरपरिषदेला आम्ही दैनंदिन भुईभाडे देतो, त्यामुळे आमचा रस्त्यावर व्यवसाय करण्याचा हक्क आहे अशीच भावना भाजीपाला, फळ विक्रेते, हातगाडीचालकांची झाली आहे.

जुन्नर नगरपरिषदेने नेहरू बाजार येथे लाखो रुपयांचा निधी खर्च करून सुसज्ज भाजी मंडईची इमारत बांधली आहे. परंतु भाजीपाला व फळ विक्रेते यांच्या आडमुठेपणामुळे ही भाजी मंडई बांधल्यापासून वापराविना पडून आहे. याठिकाणी बसून कोणीही व्यवसाय करण्यास तयार नसून, रस्त्यावरच बसून दररोजचा व्यवसाय करणार, अशी भूमिका भाजीपाला व फळ विक्रेत्यांची आहे.

जुन्नर नगरपरिषदेकडून वाहनतळाची सुविधा नसल्याने धान्यबाजार या सर्वांत मोठ्या रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मनमानी पध्दतीने दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग केलेली असतात. त्यामुळे होणार्‍या त्रासामध्ये भरच पडत आहे. जुन्नर नगरपरिषद व पोलिस प्रशासनाकडून नागरिक व वाहनचालकांना होणार्‍या मनस्तापाची दखल घेऊन या प्रश्नाबाबत कायमस्वरूपी कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नागरिक, वाहनचालक व भागातील व्यापारीवर्गाकडून होत आहे.

Back to top button