पिकअप विहिरीमध्ये पडून एकजण ठार | पुढारी

पिकअप विहिरीमध्ये पडून एकजण ठार

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील डाऊच खुर्द शिवारात समृद्धी महामार्गालगत सर्व्हिस रोडच्या कडेला असलेल्या 50 ते 60 फूट खोल विहिरीत पिकअप गाडी पडून पाण्यात बुडल्याची घटना शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत पिकअप गाडीतील एकाचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. गाडी चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारुन जीव वाचविला.
विहिरीत 50 फूट पाणी होते. ते पाणी वीज मोटारीच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. रात्री 11ः30 वाजेच्या सुमारास पिकप व्हॅनसह मृतदेह बाहेर काढण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

डाऊच खुर्द शिवारात समृद्धी महामार्गालगत सर्व्हिस रोडच्या कडेला विद्युत पोल उभारणीचे काम रुपचंद कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात येत आहे. यासाठी महिंद्रा रमेश गवळी (रा. मढी खुर्द, ता. कोपरगाव) हा गाडी चालक व जगन सीमा पाडवी (ता. तळोदा, जि. नंदूरबार) हा गाडीवरील क्लिनर हे दोघे दुपारी डाऊच खुर्द शिवारात गाडीतून पोल खाली करून निघाले असताना रस्त्याला समांतर असलेल्या विहिरीत त्यांची गाडी जाताना चालक महिंद्रा गवळी यांच्या लक्षात आले. त्यांनी गाडीतून उडी मारत जीव वाचवला, मात्र गाडीतील क्लिनर जगन पाडवी गाडीसह विहिरीतील पाण्यात पडून मृत पावला. गाडी वर काढण्यासाठी दुपारी 4 वाजे पासून शर्थीचे प्रयत्न चालू होते, मात्र रात्री उशिरा गाडी काढण्यात यश आले. गाडी मधील क्लीनर जगन पाडवी याचा मृतदेह मिळाला.

घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा बलचे निरीक्षक विलास कुर्‍हे , नगरपालिका अग्निशामक दल, विविध रुग्णवाहिका, शहर पोलिस, महामार्ग पोलिस, क्रेन मशीन यंत्रणेने येऊन मदतीचा हात दिला. यावेळी समृध्दी महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, असे माजी सरपंच संजय गुरसळ व पिकअप चालकाने दिली.

Back to top button