नाशिक : मनपाचा ‘एमएनजीएल’ कंपनीला अल्टिमेटम | पुढारी

नाशिक : मनपाचा ‘एमएनजीएल’ कंपनीला अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या शहरात सर्वत्र घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरविण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीकडून खोदकाम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे झाले असून, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराची बैठक घेत 8 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला असून, मुदतीत काम पूर्ण न झाल्यास थेट कामच बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीच्या माध्यमातून नाशिक शहरात घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी एमएनजीएलने रस्ते खोदाईसाठी महापालिकेकडे रीतसर शुल्क भरून परवानगी घेतली आहे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले खोदकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बांधकाम विभागाला वारंवार रस्त्यांची दुरुस्ती करावी लागते. नागरिकांनादेखील मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, वाहतूक ठप्प होण्याबरोबरच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नियमानुसार खड्डा करताना 200 ते 300 मीटर लांबीचा खड्डा खोदून पाइपलाइन टाकून तो खड्डा बुजविणे, त्यानंतर पुढचे काम हाती घेणे अभिप्रेत आहे. मात्र, खर्च वाचविण्यासाठी एक ते दीड किलोमीटर खड्डा खोदला जातो. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. खड्डा खोदतानादेखील नियम आहे. मात्र, जेसीबीचा पंजा खोलवर घुसवून खड्डे खोदले जात असल्याने त्यामुळे पाण्याच्या लाइन फुटून पाणीपुरवठा विस्कळीत होतो व ड्रेनेज लाइन फुटल्याने परिसरात दुर्गंधी साचून पुढची प्रक्रिया विस्कळीत होते.

ठेकेदार व उपठेकेदारांची कानउघाडणी
15 दिवसांपूर्वी ठेकेदार व उपठेकेदार तसेच एमएनजीएल कंपनीलादेखील सूचना देऊन तंबी देण्यात आली. आठ दिवस काम व्यवस्थित चालले. मात्र, त्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली. नागरिकांच्या तक्रारी अधिकच वाढल्या. या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाने जवळपास अडीच ते तीन तास बैठक घेऊन ठेकेदार व उपठेकेदारांची कानउघाडणी केली. एमएनजीएल कंपनीला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिल्या आहेत. या मुदतीत काम न झाल्यास काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा:

Back to top button