नाशिक : आदित्य यांच्या विचारांची कीव येते; दादा भुसे यांनी डागली तोफ | पुढारी

नाशिक : आदित्य यांच्या विचारांची कीव येते; दादा भुसे यांनी डागली तोफ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अयोध्येत भव्य राममंदिर आकाराला येत आहे. तेथे जाऊन रामलल्लाचे दर्शन घ्यावे, ही प्रत्येकाची इच्छा आहे. तसेच आम्हीही दर्शनाला निघालो आहोत. पण, काही वैफल्यग्रस्तांच्या हाती विरोधाचा एकही मुद्दा शिल्लक नसल्याने ते दौर्‍यावर टीका करत आहेत. अशा व्यक्तींच्या विचारांची कीव येते, अशा शब्दांत राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने अयोध्याच्या दौरा आयोजित केला आहे. या दौर्‍यावरून माजी मंत्री ठाकरे यांनी टीका करताना हे कलियुग आहे. रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत, असे वक्तव्य केले. याच अनुषंगाने नाशिक दौर्‍यावर असलेल्या ना. भुसे यांना विचारले असता ठाकरे यांच्या वक्तव्याची कीव येते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत राममंदिर व जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटविणे हे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या दोन्ही गोष्टी मार्गी लागल्याने अभिमान बाळगणे गरजेचे होते. मात्र, केवळ विरोधासाठी एकही मुद्दा हाती न राहिल्यामुळे आदित्य हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. राज्यातील शिवसेना-भाजप युतीचे शासन चांगले काम करत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रत्येक योजनेनंतर सत्ताधारी बाकांवरून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा दिल्या गेल्या. त्यावेळी या योजनांना विरोध करता येत नसल्याने विरोधी गटात शांतता पसरली होती, अशी टिपणी भुसे यांनी केली.

हेही वाचा:

Back to top button