मंजूर झालेला निधी खर्च झालाच नाही ! लोहगावमधील रस्त्यांची दुरवस्था | पुढारी

मंजूर झालेला निधी खर्च झालाच नाही ! लोहगावमधील रस्त्यांची दुरवस्था

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : महापालिका नव्याने समावेश केलेल्या गावांना निधी कमी देत असल्याने तेथील विकास ठप्प झाला आहे. असे असताना लोहगावमधील विविध रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर झालेला सहा कोटी रुपयांचा निधी मार्चअखेर खर्च झाला नाही. परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असताना मंजूर निधी वाया घालवण्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोहगावमधील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. समान पाणीपुरवठाअंतर्गत त्याचबरोबर विविध केबल टाकण्यासाठी सर्वच रस्त्यांची वारंवार खोदाई करून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. महापालिकेच्या पथ विभागामार्फत लोहगाव हद्दीपासून ते वाघोलीपर्यंतचा रस्ता विकसित करणे, लोहगावमधील विविध ठिकाणी रस्ते विकसित करणे, उर्वरित पोरवाल रस्ता विकसित करणे, डी. वाय. पाटील कॉलेज ते लोहगावपर्यंतचा रस्ता विकसित करणे आदी कामांसाठी सुमारे सहा कोटी रुपये निधी मंजूर झाला होता.

रस्त्यांच्या निविदा निघाल्यानंतर वर्कऑर्डरदेखील काढण्यात आल्या होत्या. मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळ्या माध्यमांतून घेतले होते. विद्यमान आमदारांनी तर या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजनदेखील केले होते. तर भाजपनेदेखील याच कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करणार असल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले होते. श्रेय घेण्यास चढाओढ केली. मात्र, पुढे या कामांचा पाठपुरावा केला नाही. त्यामुळे प्रशासन सुस्त झाले आणि कामे सुरू करण्यास उशीर झाल्याने आता ती वेळेत पूर्ण होणार नाहीत म्हणून करण्यात आली नाहीत.

दिरंगाई करणार्‍यांवर कारवाई करा…
मंजूर रस्त्यांची कामे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे की अन्य कोणामुळे सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी वाया गेला याचे उत्तर संतप्त लोहगावकर विचारू लागले आहेत. सदर निविदा ज्या ठेकेदारांना मिळाल्या होत्या, त्यांच्याकडून काम सुरू करण्यास दिरंगाई झाली असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच प्रशासनाकडून दिरंगाई झाली असल्यास पथ विभागाच्या अधिकार्‍यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

महापालिका प्रशासनाने सुरुवातीला मार्चअखेरची कामे 15 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे काम सुरू करता आले नाहीत. यानंतर पुन्हा 25 व 31 मार्चपर्यंतची मुदत वाढ देण्यात आली होती. तरीदेखील रस्त्यांची कामे करता न आल्याने निधी खर्च झाला नाही.

                            – प्रकाश कोतवाल, कनिष्ठ अभियंता, पथ विभाग, महापालिका

Back to top button