पुणे : पीएमपीत दिवसाला सापडतात 50 फुकटे प्रवासी | पुढारी

पुणे : पीएमपीत दिवसाला सापडतात 50 फुकटे प्रवासी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपीतून विनातिकीट प्रवास करणार्‍या फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असून, दिवसाला 40 ते 50 फुकटे प्रवासी पीएमपी प्रशासनाला सापडत आहेत. प्रशासनाकडूनही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 142 गाड्या आहेत. त्यातील 1650 ते 1700 गाड्या दररोज मार्गावर असतात. त्याद्वारे दररोज पुणे शहरातून 5 लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र, अनेक जण गर्दीचा फायदा घेत, विनातिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न करतात.

मात्र, पीएमपीने नियुक्त केलेल्या चेकर (तिकीट तपासणीस) च्या पथकाला सापडतात. दिवसाला अशा फुकट्या प्रवाशांची संख्या 40 ते 50 च्या घरात गेली आहे, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले. पीएमपीतून विनातिकीट प्रवास केल्यास 500 रुपये दंड करण्यात येत आहे. याकरिता आम्ही 12 पथकांची नियुक्ती केली आहे, त्यामुळे प्रवाशांनी ‘पीएमपीएमएल’च्या बसमधून प्रवास करताना तिकीट काढूनच प्रवास करावा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी सांगितले.

Back to top button