नाशिक : कोरोनामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर | पुढारी

नाशिक : कोरोनामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात आणि राज्यात कोविडबाधितांची संख्या वेगाने वाढत चालल्याने त्र्यंबक नगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. त्र्यंबकला देवदर्शनानिमित्त उन्हाळ्याच्या सुटीमुळे भाविकांच्या संख्येत वाढ होत चालल्याने पालिका प्रशासनाने दोन दिवसांपासून जनजागृती सुरू केली आहे.

नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, गर्दीत जाण्याचे टाळणे तसेच सर्दी-ताप यांसारखी लक्षणे असल्यास आजार अंगावर न काढता दवाखान्यात जाणे या सूचना ध्वनिक्षेपकावर जाहीरपणे देण्यात येत आहेत. नियमांचे पालन होत नसेल तर पुढच्या काही दिवसांत निर्बंध कडक केले जातील, असे संकेत दिले आहे. मुख्याधिकारी संजय जाधव यांनी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला आहे. देशाच्या व राज्याच्या विविध भागांतून येणार्‍या भाविकांमुळे नगरपालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. मंदिराची दर्शन रांग आणि सर्वत्र भाविक कोणत्याही प्रकारची काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. मास्क नसणे, गर्दीत दाटीवाटीने उभे राहणे यामुळे संसर्ग वेगाने पसरण्याचा धोका वाढला आहे. धार्मिक विधीसाठी येणारे भाविक तीन दिवस येथे मुक्कामी राहतात. त्यामुळे कोविड संक्रमणाची शक्यता वाढली आहे. मंदिराची दर्शनबारी, कुशावर्त तीर्थ, धार्मिक विधीचे ठिकाण, त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरील परिसर यासह विविध ठिकाणावर गर्दी उसळत असून, तेथे संसर्गाची भीती आहे. यामुळे सर्वांनी मास्क वापरण्यासह काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

उपजिल्हा रुग्णालय सज्ज
त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय कोविड साथरोगास सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे आणि डॉ. भागवत लोंढे यांनी सर्व नियोजन केले आहे. शनिवारी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. उपजिल्हा रुग्णालयात दररोज 50 ते 100 रॅपिड टेस्ट करण्याची सज्जता ठेवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा:

Back to top button