संगमनेरच्या पश्चिमेमध्ये गारपीट ; गारांसह पावसाने टोमॅटो, कांदा पिकांना झोडपले | पुढारी

संगमनेरच्या पश्चिमेमध्ये गारपीट ; गारांसह पावसाने टोमॅटो, कांदा पिकांना झोडपले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागाला शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास वादळ- वार्‍यासह गारपिटीने चांगले झोडपून काढले. गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या टोमॅटो, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संगमनेर तालुक्यात दोन- चार दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, शुक्रवारी संगमनेरच्या पठार भागात काही गावांमध्ये गारपीट अन् वादळ- वार्‍यासह पाऊस झाला.

पावसाने पठार भागात अनेक ठिकाणी शेत पिकांचे मोठे नुकसान झाले. आज (शनिवारी) दुपारी 4 वाजेच्या सुमारास वादळ- वार्‍यासह गारपिटीने तालुक्याचा पश्चिम भाग चांगलाच जोडपला. पश्चिम भागातील सावरचोळ, निमगाव बुद्रुक, निमगाव खुर्द, पेमगिरी, सुलतानपूर, सांगवी, नांदुरी दुमाला, कौठे धांदरफळ या भागात दुपारी अचानक वादळ- वार्‍यासह पावसासह मोठ्या गारा पडल्या. अनेकांच्या घरापुढे व शेतांमध्ये गारांचा खच जमा झाला. गारपिटीमुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या टोमॅटोसह कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने तत्काळ गारपिटग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकाचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

झाड पडल्याने वाहतूक व्यवस्था झाली ठप्प !
निमगाव पागापासून सावरचोळकडे जाणार्‍या रस्त्यावर वादळ- वार्‍यामुळे अचानक झाड पडल्याने रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. परिसरातील नागरिकांनी जेसीपीच्या साह्याने रस्त्यात आडवे पडलेले झाड बाजूला करुन, खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

Back to top button