राष्ट्रपती मुर्मू यांनी जाणून घेतली सिंधूताई यांच्या कार्याची माहिती | पुढारी

राष्ट्रपती मुर्मू यांनी जाणून घेतली सिंधूताई यांच्या कार्याची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अनाथांची माय डॉ. सिंधूताई सपकाळ या अनाथांसाठी देवदूत होत्या. परमेश्वराने त्यांच्या हातून ईश्वरीय कार्य घडविण्यासाठी त्यांना पृथ्वीवर पाठविले होते. परंतु काळाने झडप घालून त्यांना कमी वयात हिरावून घेतले. त्यांच्या आकस्मिक निधनाने समाजाची खूप मोठी हानी झाली आहे. जी कदापि भरून निघणार नाही, अशा भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सिंधूताई सपकाळ यांच्याविषयी व्यक्त केल्या.

डॉ. सिंधूताई सपकाळ यांचे मानसपुत्र तथा ममता बालसदन (कुंभारवळण, पुणे) या अनाथ मुलींच्या आश्रमाचे अध्यक्ष दीपक गायकवाड आणि मुकेश चौधरी यांनी नुकतीच दिल्ली येथे मुर्मू यांची नुकतीच भेट घेतली. त्यांनी डॉ. सपकाळ यांच्या कार्याची व सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह (चिखलदरा), ममता बालसदन (सासवड), सन्मति बालनिकेतन (मांजरी बु.), मनःशांती छात्रालय (शिरूर) , गोपिका गाय रक्षण (वर्धा ) आदी संस्थाची माहिती मुर्मू यांना दिली.

ममता बालसदनमध्ये डॉ. सिंधूताई सपकाळ यांच्या जन्मदिनी आयोजित बालमेळाव्यात उपस्थित राहून अनाथ मुलींशी माईंसारखा संवाद साधावा तसेच डॉ. सपकाळ यांच्या पुतळ्याचे अनावरण करावे, असे निमंत्रण गायकवाड यांनी मुर्मू यांना दिले. मुर्मू यांनी निमंत्रण स्वीकारत अनाथ मुलींच्या आश्रमाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. जवळपास 22 मिनिटे गायकवाड यांच्याशी मुर्मू यांनी संवाद साधला.

Back to top button