अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा गौतमी पाटीलवर हल्लाबोल म्हणाल्या… | पुढारी

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा गौतमी पाटीलवर हल्लाबोल म्हणाल्या...

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गौतमी पाटीलच्या नृत्याला कला म्हणणे बरोबर वाटणार नाही, असे मत भाजप सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांनी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत यांनी व्यक्त केले.

त्या म्हणाल्या, गौतमी पाटील व आत्ताच्या काही मुलींना लावणी सादर करताना पाहिले की, ते बरोबर वाटत नाही. गौतमीचे मानधन सोशल मीडियाने वाढविले. असले नाचगाणे पाहणे जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत हे सुरू राहील. काय पहायचे, काय नको, हे लोकांनी ठरवले पाहिजे. चित्रपट, नाट्यक्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच तमाशा कलावंत, लोककलावंत यांना राजाश्रयाबरोबरच लोकाश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

त्या म्हणाल्या, कोरोनामध्ये अनेक कलाकार, तंत्रज्ञांना काम मिळाले नाही. त्यांची परिस्थिती वाईट झाली होती. मोजक्या कलाकारांना पैसा, ग्लॅमर मिळते. पण, तळागाळातील बहुसंख्य कलाकारांना हलाखीच्या स्थितीला तोंड द्यावे लागले. तमाशा कलावंत, लोककलावंत यांच्यासाठीही काम करणे गरजेचे आहे. त्यांना राजाश्रय आवश्यक आहे. महापालिकेने नाटकांच्या तालमीसाठी जागा द्यावी, सरकारने हौशी कलाकारांसाठी योजना राबवाव्यात, अशी मागणी भाजप सांस्कृतिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र आमले यांनी केली. यावेळी ओंकार शुक्ल, केदार खाडीलकर, व्यंकटेश बिदनूर, माणिक उपस्थित होते.

मंगेशकर नाट्यगृह होते बंद..!

प्रिया बेर्डे यांनी शनिवारी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाला भेट देण्यासाठी गेल्या. मात्र नाट्यगृह बंद होते. त्यांनी सांगलीत हनुमाननगर येथे होणार्‍या नवीन नाट्यगृहाच्या जागेची पाहणी केली. नवे नाट्यगृह बांधताना या क्षेत्रातील सर्वांशी विचारविनियम व्हावा, इंजिनिअर, आर्किटेक्टस यांचाही विचार घ्यावा, असा विचार त्यांनी मांडला.

चित्रपट महामंडळ.. क्लिष्ट विषय

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हा क्लिष्ट व वेगळा विषय आहे. ते काय करतात? त्यांचे काय चालले आहे, हे कळत नाही. कोल्हापूर ही कलानगरी आहे. याठिकाणी कलेला पुन्हा ऊर्जितावस्था मिळाली पाहिजे. महामंडळाचे पदाधिकारी माझ्याकडे आले तर मराठी चित्रपटासाठी शासनदरबारी जरूर प्रयत्न करू, असे मतही प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केले.

Back to top button