Saptashrungi Devi Chaitrotsav : 4500 फूट उंच सुळक्यावर मध्यरात्री फडकतो कीर्तीध्वज ; काय आहे परंपरा? | पुढारी

Saptashrungi Devi Chaitrotsav : 4500 फूट उंच सुळक्यावर मध्यरात्री फडकतो कीर्तीध्वज ; काय आहे परंपरा?

वणी ( जि. नाशिक) : अनिल गांगुर्डे 

वणीच्या सप्तशृंगीगडावर रामनवमीपासून चैत्रोत्सवाला सुरवात झाली असून, धार्मिकदृष्ट्या चतुर्दशीचा (चावदस) दिवस मंगळवार (दि. ४) हा चैत्रोत्सवातील मुख्य दिवस आहे. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार आदिशक्ती सप्तशृंगमातेचा कीर्तिध्वज समुद्रसपाटीपासून ४५६९ फूट उंचीवर लाखो भाविकांच्या साक्षीने मोठ्या डौलात फडकणार आहे. या कीर्तिध्वजाचे मानकरी असलेले दरेगाव (वणी) येथील  गवळी (पाटील) परिवार वंशपरंपरेने आदिमायेच्या मंदिर शिखरावर ध्वज लावतात. विशेष म्हणजे देवीच्या शिखरावर चढण्यासाठी कोणताही मार्ग नाही. तरीही हे अवघड कार्य दरेगावचे गवळी (पाटील) कुटुंबीय वंशपरंपरेने करीत आले आहेत.

सप्तशृंगीगडाच्या शिखरावर वर्षभरातून दोनदा कीर्तिध्वज फडकवला जातो. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजेच चतुर्दशीच्या मध्यरात्री हा ध्वज फडकविण्याची परंपरा चालत आली आहे. तर, नवरात्रोत्सवात विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीच्या मध्यरात्री आदिशक्ती आदिमाया श्री. भगवतीचा कीर्तिध्वज (भगवे निशाण) मंदिरावरील अतिशय अवघड व उंच अशा सुळका चढून शिखरावर फडकविले जाते. दरेगाव येथील गवळी पाटील कुटुंबीयांना शेकडो वर्षांच्यानुसार कीर्तिध्वजाचा मान आहे.

गवळी-पाटील हे ध्वज पूजेचे साहित्य घेऊन उत्तरेकडील सुळक्यावरून रात्र असतानाही टेंभा किंवा प्रकाशासाठी लागणारे कोणतेही उपकरण न घेता चार ते पाच तासांनी मार्गावरील इच्छित देवतांचे पूजन करीत शिखरावर पोचतात. यानंतर तेथील जुना ध्वज काढून तेथे नवा ध्वज लावला जातो. ध्वजाचे दर्शन घेऊन खानदेशवासीय परतीच्या मार्गाला लागतात.

गवळी कुटुंबीयांना मान 

सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी दरेंगाव असून येथील गवळी कुटुंबाला किर्तीध्वज फडकविण्याचा मान आहे. गवळी परिवारातील आजोबा रायाजी पाटील यांच्यापासून गडावर ध्वज लावण्यात येत आल्याचे गवळी कुटुंबीय सांगतात. तो ध्वज रेणूकादास महाराज यांचे वंशज व बेटावद गावातील आघार, ठेंगोडा, देवळा, कळवण, नांदुरी या मार्गाने पायी प्रवास करून शेवटी गडावर पोहचत. गडावर आल्यानंतर चैत्र शुध्द चतुर्दशीला रात्री ध्वज लावला जात असे. सध्या देवस्थानचा कारभार पाहण्यासाठी विश्वस्त संस्थेची स्थापना झाल्यापासुनच हा ध्वज कार्यालयात जमा केला जातो.

दरेगाव येथील हरी गवळी, लक्ष्मण गवळी, रामकृष्ण गवळी, तुळशीराम गवळी यांचा वारसा सध्या ६५ वर्षीय एकनाथ गवळी पाटील यांनी पुढे सुरू ठेवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबातील सदस्य आपापसांत मान ठरवून शिखरावरील निशाण फडकविण्याची परंपरा जपत आहेत. आतापर्यंत अनेकांनी शिखरावर पोचण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरला किंवा पुन्हा समोर आलेला नाही.

असा असतो किर्तीध्वजाचा कार्यक्रम
विश्वस्त संस्थेमार्फत दरेगांवचे गवळी (पाटील) चैत्र शुध्द चतुर्दशी व अश्विन शुध्द नवमी असे वर्षातून दोन वेळेस शिखरावर ध्वज लावतात. हा ध्वज 11 मीटर केशरी रंगाच्या कापडाचा बनवण्यात येतो. तसेच ध्वजासाठी 10 फुट उंचीची काठी व सुमारे 20 ते 25 किलो वजनाचे पूजा साहित्य घेऊन ध्वजाचे मानकरी ध्वज लावतात.

रेणुकादास महाराजांचे वंशज बेटावद येथून 1981 सालापासून आजही पायी वारी करून ध्वज घेऊन येत असतात. बेटावद प्रमाणेच अनेक भाविक गडावर दर्शनासाठी येतांना लहान मोठे ध्वज घेऊन श्री भगवती मंदिराच्या परिसरात लावतात. त्यामुळे यात्रा उत्सवात मंदिराच्या परिसरात ध्वजच ध्वज दिसतात.

मध्यरात्री फडकविला जातो ध्वज…

मध्यरात्रीच हा ध्वज फडकविण्याची पंरपरा चालत आली आहे. र्षभरातून चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री व नवरात्रौत्सव विजयादशमीच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीच्या मध्यरात्री भगवे निशाण शिखरावर फडकविले जाते. शिखरावर जाऊन तेथील पुजा विधी करण्यासाठी 10 फुट लांब काठी, 11 मीटर केशरी कापडाचा ध्वज, पुजेसाठी गहु, तांदुळ, कुंकु, हळद तसेच झेंडा घेवून जाणाऱ्या मार्गातील विविध ठिकाणी देवतांसाठी लागणारे साहित्य नैवेद्य आदिसह साहित्य घेऊन जावे लागते.

सप्तशृंगी गड समुद्र सपाटीपासून 4 हजार 500 फुट उंचीवर आहे. या शिखरावर जाण्यासाठी कुठुनही रस्ता नाही, सरळ शिखरावर जाणे म्हणजे मृत्यूला आंमञण देणे असे आहे. मात्र तरीदेखील पाचशे वर्षांपासून ही परंपरा जोपासत आली असून यामध्ये कोणालाही अद्याप दुखापत झाली नसल्याचे भाविक सांगतात.

हेही वाचा : 

Back to top button