दूध संकलन केंद्रांवर मिल्कोमीटर बंधनकारक | पुढारी

दूध संकलन केंद्रांवर मिल्कोमीटर बंधनकारक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दूध संकलन केंद्रांवर दूध तपासणीसाठी वापरण्यात येणार्‍या सदोष मिल्कोमीटर व वजन काट्यांच्या विरोधात किसान सभेने आंदोलन सुरू केले. तसेच या माध्यमातून शेतकर्‍यांची मोठी लूटमार केली जात असल्याचा आरोप केला. किसान सभेने या विषयावर वारंवार पाठपुरावा करत आंदोलन सुरूच ठेवले. यानंतर या पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्य सरकारने दूध कंपन्यांना मिल्कोमीटर प्रमाणीकरण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती किसान सभेकडून देण्यात आली आहे.

किसान सभेने म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार मिल्कोमीटर व वजनकाटे, राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागाच्या अंतर्गत असलेल्या नियंत्रण, वैधमापन शास्त्र या यंत्रणेमार्फत नियमित तपासण्यात येतील असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दूध उत्पादकांची लूटमार थांबविण्यासाठी दूध संस्थांना प्रमाणित मिल्कोमीटर वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय मिल्कोमीटर तपासणीसाठी स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक करण्याची कारवाई प्राधान्याने करण्यात येईल, असे लेखी आश्वासन राज्य सरकारने दिले आहेत.

Back to top button